लक्झरी जीवन जगण्यासाठी लक्झरी कारची चोरी; निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या एमबीए मुलाचा २० वर्षांचा 'कार'नामा, एकदा वाचाच
लहानसहान चोरी पासून ते दरोडा घालण्यापर्यंतच्या घटना आपल्या आजूबाजूला नेहमीच घडत असतात. कधी चैनीसाठी चोरी करणारे चोर तर कधी पेशेवर चोरांचा या घटनांमागे हात असतो. पण तुम्ही कधी ऐकलंय का की फक्त आलीशान जीवन जगण्यासाठी तितक्याच अलिशान गाड्या चोरणारा चोर असेल तर आणि तो पण मॅनेजमेंटची पदवी घेतलेला, तुमचा विश्वास बसणार नाही पण फक्त चित्रपटांमध्ये पाहिलेला असाच एक चोर पोलिसांच्या हाती लागला आहे. तब्बल २० वर्षांपासून तो आलीशान गाड्यांची चोरी करून इतर राज्यांमध्ये विक्री करत होता.
तामिळनाडूतील चेन्नईतील अण्णा नगर येथे झालेल्या चोरीमध्ये चोरी झाली होती. गेल्या महिन्यात अण्णा नगरमधील कथिरावन कॉलनीतील रहिवासी एथिराज रथिनम यांनी घराच्या बाहेर त्यांची महागडी आलीशान कार पार्क केली होती. मात्र पहाटे त्यांची कार चोरीला गेली. पहाटे आलेल्या त्या चोराने अत्याधुनिक साधनांचा वापर करून कार पळवली होती. त्यांच्या डोळ्यादेखत हा सर्व प्रकार घडला होता. इतकी महागडी कार चोरीला गेल्याने एथिराज यांना धक्का बसला आणि ते अस्वस्थ झाले. जवळच बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे त्याने तिरुमंगलम पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि सीसीटीव्ही फुटेज तपासून चोराचा शोध सुरू केला. पोलिसांच्या तपासात संशयित पुद्दुचेरीमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी धाड टाकून राजस्थानच्या सतेंद्र सिंह शेखावतला अटक केली. पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली आणि पोलिसांना धक्काच बसला. सतेंद्र एमबीए पदवीधर आहे आणि त्याचे वडील निवृत्त लष्करी अधिकारी आहेत.
गेल्या २० वर्षांपासून सतेंद्र सिंह तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरीसह अनेक राज्यांमधून आधुनिक उपकरणांचा वापर करून आलिशान गाड्या चोरत होता. चोरी केलेल्या या महागड्या कारची तो राजस्थान आणि नेपाळमध्ये विक्री करून पैसे कमवत होता.
सतेंद्रने आतापर्यंत १०० हून अधिक आलीशान गाड्या चोरल्या आहेत आणि त्या विकून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांमधून तो आलीशान जीवन जगत होता. मात्र गुन्हेगार काही ना काही मागे सुराग सोडतो, फक्त योग्य वेळ यावी लागते, असं पोलिस सांगतात सतेंद्रनेही तेचं केलं. पहाटे चोरी करण्याची चूक केली आणि थेट कार मालकाच्या नजरेला पडला आणि संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफार्श झाला.
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगने माजवली दहशत; ‘आम्हीच इथले भाई’ म्हणत १० ते १२ वाहनांची केली तोडफोड
चेन्नई पोलिसांनी सतेंद्रला अटक करून न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयात त्याची तुरुंगात रवानगी केली. सतेंद्रला अटक झाल्याचं समजताच चोरी झालेले कार मालकांनी तिरुमंगलम पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. त्यामुळे पोलिस ठाण्यात एकच गोंधळ उडाला होता. दरम्यान सत्तेंद्रने या अलिशान कार कुठे विक्री केल्या याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे, मात्र त्या आलीशान कार त्यांच्या मूळ मालकांना मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.