Crime News Live Updates
19 Aug 2025 02:00 PM (IST)
नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हसनाळ गावातील दोन महिलांचे मृतदेह सापडले आहेत. गंगाबाई मादळे आणि भीमाबाई मादळे यांचे मृतदेह सापडले आहे. अन्य चार ते पाच जणांचा शोध सुरू आहे.
19 Aug 2025 01:40 PM (IST)
परळी हुडा कौडगाव येथील पुलावरून जात असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने फॉर व्हीलर गाडी पुलावरून नदीच्या पात्रात वाहून गेली. रात्री एक वाजताच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की दिग्रस येथील काही तरुण गाडीमधून जात असतांना कवडगाव हुडा येथे पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेले आहेत. पाण्याचा अंदाज नसतानाही पोहण्याचा अनुभव गाठीशी असल्यामुळे पोलिस मार्ग काढत रिक्षा घेऊन पाण्यात उतरले. दोर वापरून युवकांना वाचवण्याचा प्रयत्न केला.
19 Aug 2025 01:20 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर शहराच्या हर्सूलमधून एक थरारक घटना समोर आली आहे. ३१ जुलैला बेपत्ता झालेल्या छावा संघनटनेचा शहर प्रमुख सचिन पुंडलिक औताडे यांचा प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कॅनॉट भागात त्यांच्या प्रेयसीने तिच्या मामेभावाच्या मदतीने सचिन यांचा काटा काढला. गळा चिरून हत्या केली त्यानंतर मृतदेह गोदावरी नदीत फेकून दिला. वाहत गेलेला हा मृतदेह मुंगी गावात येथे तरंगत काठावर आला आहे. त्यानंतर हा हत्याकांड समोर आला आहे.
19 Aug 2025 01:05 PM (IST)
पुणे शहरात पीएमपी बसमधील गर्दीचा फायदा तसेच बसमध्ये बसताना प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याच्या घटना सुरूच असून, कर्वे रोड परिसरात पीएमपी बस थांब्यावर बसमध्ये चढताना ज्येष्ट महिलेकडील ६० हजारांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ६६ वर्षीय महिलेच्या ६९ वर्षीय पतीने डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार, अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
19 Aug 2025 12:50 PM (IST)
वालचंदनगर भागात दहशत माजविणारा तसेच ग्रामीण भागातील कुख्यात गुंड राजू भाळे याच्यासह १३ जणांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोक्का (महाराष्ट्र संघटित गुनहेगारी नियंत्रण कायदा) कारवाई केली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी हे आदेश दिले आहेत. पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलीस कर्मचारी महेश बनकर, अभिजित कळसकर यांनी ही कारवाई केली आहे. खोरोचीतील कुख्यात गुन्हेगार राजू भाळे आणि त्याच्या टोळीतील गुंडांनी उत्तम जाधव यांचा खून केला होता. या खुन प्रकरणात राजू भाळे याच्यासह १० जणांना अटक केली. त्यांच्याबरोबर असलेले तीन साथीदार पसार झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
19 Aug 2025 12:30 PM (IST)
1 ऑगस्टला हा सगळा प्रकार समोर आला होता. कोथरूड पोलिसांनी तीन मुलींना मारहाण आणि जातीवाचक शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप मुलींनी केला होता. तुम्ही किती मुलांसोबत झोपलात? तुम्ही लेस्बिअन आहात का ? अशा घाणेरड्या शब्दात पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून या मुलींना प्रश्न विचारले होते, असा आरोप तीन मुलींनी केला होता. याप्रकरणी या मुली आणि त्यांचे काही सहकारी आक्रमक झाल्याच पाहायला मिळालं होत. आणि त्यांनी थेट पोलिसांकडेच दाद मागायला सुरुवात केली. मात्र पोलिसांकडनं कोणतीही दाद मिळत नसल्याचा आरोप देखील याच मुलींच्या सहकाऱ्यांनी केला होता. ऊलट त्या तीन तरुणींवरच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
19 Aug 2025 12:10 PM (IST)
पुणे जिल्ह्यातून एक घटना समोर आली आहे. महिंद्रा कंपनीत किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून कामगारांमध्ये मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी कोयत्यानेही हल्ला केला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे. या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सोहेल चुन्ना खान (३७, रा. आकुर्डी) यांच्या तक्रारीवरून सुरज सरोदे (२५), प्रतीक उबाळे (२३), अंशु रोकडे (२२) आणि प्रथमेश (२५, सर्व रा. घरकुल, चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
19 Aug 2025 11:53 AM (IST)
पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्लॉटमध्ये टाकलेला राडारोडा काढण्यास सांगितल्यावरून दगडाने व लाकडी बांबुने एकाला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश रघुनाथ ढोकले (४५, रा. करंदीता, शिरूर, जि. पुणे) व त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गणेश मोहन खुटवड (४०, रा. मु. पो. टाकळी भिमा, ता. दौंड, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार वाघोली बकोरी रोड येथील श्रीरामचंद्र व्हिला जवळ घडला आहे.
बीडच्या गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीतून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. पती-पत्नीच्या वादात आईने दोन वर्षीय मुलीचा दोरीने गळा आवळून स्वतः आत्महत्या केलीय. हि घटना गेवराई तालुक्यातील मालेगाव मजरा या गावात उघडकीस आली असून मायलेकीच्या मृत्यूने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोबतच या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.