फोटो सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स असलेल्या प्रसिद्ध रीलस्टार दिव्या सुनील शिंदे हिच्यावर निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घरात घुसून तोडफोड आणि मारहाण केल्याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी कारवाई केली आहे. डॉ. विद्याधर गायकवाड यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केल्यानंतर पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने दहा जणांना सोबत घेऊन त्यांच्या घरी जाऊन गोंधळ घातल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात डॉ. गायकवाड जखमी झाले असून, न्यायालयाने दिव्या शिंदे हिला ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड हे ‘करुणादीप’ संस्थेचे सदस्य आहेत. या संस्थेच्या वतीने २ आणि ३ सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘कला आविष्कार महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात रीलस्टार दिव्या शिंदे सहभागी झाली होती. कार्यक्रम संपल्यानंतर दिव्या शिंदे हिने डॉ. गायकवाड यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, डॉक्टरांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्यात वाद झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पैशांची मागणी पूर्ण न झाल्याने दिव्या शिंदे हिने तब्बल दहा जणांना सोबत घेऊन डॉ. गायकवाड यांच्या घरी गेल्याचा आरोप आहे. यावेळी घरातील साहित्याची तोडफोड करण्यात आली. तसेच डॉ. गायकवाड यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या हल्ल्यात ते जखमी झाले. घटनेनंतर डॉ. गायकवाड यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार दिव्या शिंदे आणि तिच्या दहा साथीदारांविरुद्ध विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिव्या शिंदेला अटक करून न्यायालयात हजर केले.
न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने डॉ. गायकवाड गंभीर जखमी असल्याचे नमूद केले. तसेच गुन्ह्यात सहभागी असलेल्या अन्य दहा आरोपींचा शोध घेणे, त्यांच्याकडून घटनेबाबत माहिती मिळवणे आणि प्रकरणाचा सखोल तपास करणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. त्यानंतर न्यायालयाने दिव्या शिंदे हिला ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.दरम्यान, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच पाच लाख रुपयांच्या मागणीमागील नेमके कारण काय होते, याचा तपास काळेपडळ पोलीस करत आहेत. फरार असलेल्या अन्य संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.






