File Photo : Crime
अहमदनगर : शहरासह जिल्ह्यात घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सहा महिन्यांत चोरट्यांनी 300 पेक्षा अधिक घरांवर डल्ला मारत कोट्यवधी रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. दरम्यान, सर्वाधिक घरफोडीचे गुन्हे दिवाळी सुट्यांमध्ये झाले आहेत. कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प, अहिल्यानगर तालुका, एमआयडीसीसह जिल्हाभरात विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दररोज सरासरी दोन ते तीन घरफोड्या होतात.
हेदेखील वाचा : ऐन विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारावर गुन्हा दाखल; मनसे पदाधिकाऱ्यानेच दिली तक्रार, कारण…
ज्याच्या घरी चोरी झाली त्याच्या फिर्यादीवरून तत्काळ घरफोडीचा गुन्हा दाखल होतो. परंतु, संबंधित पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून तपासही केला जातो. मात्र, काही कारणास्तव आरोपीपर्यंत पोहण्यात अडचण येतात. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या काही टोळ्या गजाआड केल्या आहेत, तरी देखील घरफोडीचे हे सत्र थांबलेले नाही. शहरात सर्वाधिक घरफोडीचे गुन्हे हे कोतवाली व तोफखाना पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील आहेत.
काहीजण घराला कुलूप लावून टेरेसवर झोपतात. काहीजण मौल्यवान वस्तू घरात ठेवून गावी जातात. नागरिकांनी आपले घर, अपार्टमेंट, वसाहत, दुकानाच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे. घरफोड्या होणार नाहीत, यासाठी आम्ही दक्ष असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तोफखाना-कोतवाली पोलिसांचे दुर्लक्ष; नागरिकांचा आरोप
सावेडी उपनगरासह शहरात घरफोडीचे गुन्हे वाढले आहेत. कोतवाली व तोफखाना पोलिस त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे साधी एनसी (अदखलपात्र) दाखल होताच पोलिस तत्परता दाखवतात. ज्याच्या विरोधात तक्रार अर्ज आहे, त्या संबंधिताला पोलिस ठाण्यात बोलावले जाते. तक्रार देणारा व ज्याच्या विरोधात तक्रार आहे, अशा दोघांची मध्यस्ती करत प्रकरण दाबले जात असल्याची चर्चा सुरु आहे.
चोरीचे सर्वाधिक गुन्हे
दुचाकी चोरी, मोबाईल चोरी, तसेच इतर किरकोळ चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासाकडे पोलिसांचा दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही स्थानिकांकडून केला जात आहे. त्यामुळे दर महिन्याला चोरीचे शेकडो गुन्हे दाखल होत आहेत. विशेष म्हणजे या गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्याऐवजी त्यात मोठी वाढ होत आहे.
हेदेखील वाचा : निवडणुकीच्या तोंडावर विक्रोळीमध्ये मोठा छापा; कोट्यवधी किमतीच्या साडेसहा टन चांदीच्या विटा जप्त
विक्रोळीत पोलिसांचा छापा
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सध्या प्रचाराचा धुराळा उडाला असून सभा आणि बैठका वाढल्या आहेत. मागील महिन्यामध्ये निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली. तेव्हापासून राज्यामध्ये आदर्श आचारसंहिता सुरु आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानंतर राज्यामध्ये सरकार स्थापन केले जाणार आहे. पण त्यापूर्वी विक्रोळीमध्ये मोठा छापा मारण्यात आला आहे.