दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना समोर येत आहे. महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. पोलीस अथक प्रयत्न करत असून सुद्धा असे प्रकार घडत आहे. आता नाशिकच्या म्हसरूळ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यावसायिक फोटोग्राफर तरुणी व तिच्या मैत्रिणीला हॉटेलमधून जबरदस्तीने डांबून, पिस्तुलाचा धाक दाखवत अनैतिक व्यवसाय कारण्याबाबत सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात हॉटेलचालसह त्याच्या साथीदाराविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नेमकं काय घडलं?
पीडित तरुणी आणि तिच्या मैत्रिणीचा वेटर मोहीत ताम्हाणेशी पूर्वीपासूनच परिचय होता. त्याने 2020 पासून त्यांच्याकडून आर्थिक मदत घेतली होती. एके दिवशी तो ‘कॅटल हाउस’ हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळाल्यावर त्या दोघी व त्यांचा एक मित्र तिथे गेले. तेव्हा हॉटेलमालक सौरभ देशमुख याने त्यांना थेट धमकी देत म्हटले की, “तुम्ही इथे येऊन मोठी चूक केली आहे. माझ्या हॉटेलमध्ये कॉलगर्ल्स पुरवल्या जातात, आता तुम्ही दोघीही तेच काम करा. चांगले पैसे देईन, आणि मोहीतकडून पैसे मागण्याची गरजही भासणार नाही,” असे म्हटले.
त्यांना बंद खोलीत डांबले
या अनपेक्षित आणि धक्कादायक प्रसंगानंतर तिघांनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र देशमुख याने त्यांच्यावर पिस्तूल रोखून त्यांना बंद खोलीत डांबून ठेवले. एवढ्यावरच न थांबता त्याने जिवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्या जवळील 21 हजार रुपये काढून घेतले. अखेर पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांना सोडण्यात आले.
भीतीपोटी केली नव्हती तक्रार
त्यांनतर हा प्रकरण इथेच थांबले नाही. काही दिवसांनी मोहित ताम्हणे याने व्हॉट्सॲपवरून पुन्हा धमकीचे मेसेज पाठवले. त्यामुळे पीडित तरुणींनी अखेर धैर्य करून पोलिसांत तक्रार दाखल केली. हा प्रकार चार महिन्यांपूर्वी घडला होता मात्र भीतीपोटी तक्रार केली नव्हती. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित हॉटेल चालक सौरभ संजय देशमुख आणि त्याचा साथीदार वेटर मोहीत मिलिंद ताम्हाणे यांना अटक केली. त्यांच्यावर या प्रकरणी विनयभंग, जबरदस्ती, डांबून ठेवणे, दरोडा, धमकी देणे अशा विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात देशमुख व ताम्हाणे यांच्यावर पूर्वीही असेच आरोप असल्याचे स्पष्ट झाले आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
हॉटेलचालकाचा इतिहास
संशयित सौरभ देशमुख याचे ‘कॅटल हाउस’ नावाचे हॉटेल असून, त्याच्यावर यापूर्वीही बेकायदेशीर कृत्यांबाबत पोलिसांनी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे सौरभ हा एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा आहे. त्याच्याकडून हॉटेलमध्ये अनेकदा अनैतिक व गैरकायदेशीर व्यवहार होत असल्याच्या तक्रारी असून, पोलिसांपासून बचावासाठी तो आणि त्याचे कर्मचारी वैयक्तिक वॉकी-टॉकी वापरत असल्याचेही उघड झाले आहे.