सौजन्य फोटो - सोशल मिडीया
नालासोपारा : मैत्रीच्या माध्यमातून ओळख वाढवून प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, त्यानंतर धर्मांतरासाठी दबाव टाकणे, मारहाण आणि लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार नालासोपारा येथे समोर आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने १२ ऑक्टोबर रोजी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुख्य आरोपी आरिफ शेख याच्यासह त्याची आई रुक्साना शेख आणि मावस भाऊ साहिल खान यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात आरोपींकडून आपल्यावर धर्मांतरासाठी दबाव आणण्यात आल्याचा दावा केला आहे. तसेच मारहाण आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपही तिने केला आहे.
पीडितेच्या म्हणण्यानुसार, एका मैत्रिणीच्या माध्यमातून तिची आरिफ शेखशी ओळख झाली. ओळख वाढल्यानंतर आरिफने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने त्याची आई रुक्साना शेख ही अॅस्ट्रोलॉजर असल्याचे सांगून पीडितेची तिच्याशी भेट घडवून आणली. रुक्सानाने पीडितेला तिची आई मरण पावली असून घरात भूत असल्याची तसेच घरातीलच व्यक्ती तिला मारून टाकतील, अशी भीती दाखवल्याचा आरोप आहे. त्यानंतर पीडितेला आरोपीच्या घरी राहण्यास भाग पाडल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. १ एप्रिल २०२५ रोजी ती आरोपीच्या घरी राहण्यास गेल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून आरिफने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
५ मे २०२५ रोजी आरिफ आणि पीडिता दुसऱ्या ठिकाणी भाड्याने राहू लागले. त्या ठिकाणी केवळ हिंदू नागरिकांनाच खोल्या दिल्या जात असल्याने आरिफने स्वतःला पीडितेचा भाऊ असल्याचे भासवून तिच्यासोबत राहण्यास सुरुवात केल्याचा दावा करण्यात आला आहे. विरोध केल्यास आरिफ मारहाण करत असल्याचे पीडितेने म्हटले आहे. जुलै २०२५ मध्ये आरिफचा मावस भाऊ साहिल खान यानेही तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्याला विरोध केल्यानंतर आरिफ आणि साहिल या दोघांनी मिळून मारहाण केल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.
धर्मांतरासाठी दबाव आणताना पीडितेला गोमांस खाण्यास आणि हिजाब परिधान करण्यास सांगितले जात असल्याचा आरोप आहे. त्यास नकार दिल्यास मारहाण केली जात असल्याचेही तिने पोलिसांना सांगितले. आरिफने अनेक हिंदू तरुणींना अशाच प्रकारे लक्ष्य केल्याचा दावा पीडितेने केला आहे. तसेच मुलींचे अश्लील फोटो काढून त्यांच्याकडून पैसे उकळणे आणि लैंगिक अत्याचार करण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोपही तिने केला आहे. आरिफने ७० ते ८० हिंदू मुलींना लक्ष्य केल्याचे आपल्यासमोर सांगितल्याचा दावा पीडितेने केला आहे. नवरात्रोत्सव आणि गणेशोत्सवाच्या काळात हिंदू तरुणींना लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही तिने केला आहे. या आरोपांची पोलिसांकडून चौकशी केली जात असून, या प्रकरणात आणखी पीडित महिला किंवा तरुणी तक्रार देतात का, याकडेही लक्ष लागले आहे.
आरिफ हा तरुणींना जाळ्यात ओढणाऱ्या मोठ्या टोळीशी संबंधित असल्याचा दावा पीडितेने केला आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आरोपींचे इतर कोणाशी संबंध आहेत का, अशा प्रकारची आणखी प्रकरणे आहेत का आणि पीडितेने केलेले आरोप कितपत खरे आहेत, याचा तपास पोलिसांकडून केला जाणे अपेक्षित आहे.






