संग्रहित फोटो
नाशिक : नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात वाढत्या ‘स्ट्रिट क्राईम’ मुळे शहरात धास्तावलेल्या नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा कडक मोहीम हाती घेतली आहे. शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड्यावर दारू पिणाऱ्या (ओपन बार) मद्यपींवर पोलिसांनी थेट दंडुका उगारण्यास सुरुवात केली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या आदेशानुसार, शहरातील १४ ही पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांची पथके हद्दीतील दारू दुकानांबाहेर, वाईन शॉप्स आणि मोकळ्या जागांवर गस्त घालून कडक कारवाई करत आहेत.
पोलीस आयुक्तालयाने रस्त्यावरील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी शहरातील ‘ब्लॅक स्पॉट’ शोधून काढले आहेत. या ठिकाणी मोकळ्या जागा व गल्लीबोळांत टवाळखोरी करणाऱ्यांना चांगलाच चोप दिला जात असून, चालू वर्षात जानेवारी ते २६ जूनपर्यंत तब्बल ११ हजार ६८५ पेक्षा जास्त टवाळखोरांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे. एकट्या जून महिन्यात आतापर्यंत ४३८ पेक्षा जास्त टवाळखोरांना दणका देण्यात आला आहे. या कारवाईचे थेट व्हिडिओ शूटिंग केले जात असून, टवाळखोरांची विशेष यादीही तयार करण्यात येत आहे.
गुन्हेगारांवर मोक्का, तडीपारीची कुऱ्हाड
सलग आठ दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या या ‘दृश्यस्वरूपातील पोलीसिंग’ मुळे टवाळखोरांचे धाबे दणाणले आहेत. सातत्याने टवाळखोरी करणाऱ्या आणि विविध गुन्ह्यांत सामील असलेल्या संशयितांविरुद्ध मोक्का, तडीपारी आणि एमपीडीए अंतर्गत कडक कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. या धडक मोहिमेत सातत्य ठेवण्याच्या सूचना सर्व प्रभारी निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता शहरातून गुन्हेगारी हद्दपारीसाठी पोलिसांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे.
‘रोमिओगिरी’ खपवून घेणार नाही
शहरामध्ये कोणत्याही प्रकारची रोमिओगिरी खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड इशारा पोलीस आयुक्तालयाने दिला आहे. पोलीस आयुक्तांनी महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले असून, महिलांच्या तक्रारीनुसार तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रस्त्यावर धुमाकूळ घालणाऱ्या आणि ‘रॅश ड्रायव्हिंग’ करून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या हुल्लडबाजांवरही मोठी दंडात्मक कारवाई केली जात आहे.
हे सुद्धा वाचा : तू शहर सोडून जा, नाहीतर तुला…; संभाजीनगरमध्ये जीम ट्रेनर तरुणीचा 7 महिने पाठलाग






