Navi Mumbai : पोलीस कस्टडीत प्रकृती बिघडली, 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; मृत्यूचं गूढ कायम. सौजन्य : आयएएनएस
नवी मुंबईत (Navi Mumbai) पोलीस कोठडीत असलेल्या 38 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संजय कांतू यादव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देण्यात आली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
संजय कांतू यादव याला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलिसांनी एका प्रकरणात अटक केली होती. उलवे सेक्टर 6 येथील अनंता टॉवरमध्ये तो राहत होता. तो मूळचा उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील रहिवासी होता. अटकेनंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, 8 ऑक्टोबर रोजी यादवला नवी मुंबईतील एनआरआय सागरी पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी लॉकअपमधील कर्मचाऱ्यांना तो वारंवार मुठी आवळत असल्याचे तसेच त्याचे हात-पाय आखडत असल्याचे दिसून आले. त्याची प्रकृती बिघडल्यानंतर पोलिसांनी तातडीने त्याला नेरुळ येथील मीनाताई ठाकरे रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
यादवची अटक करण्यापूर्वी पनवेल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. तसेच न्यायालयात हजर केले असतानाही त्याने कोणत्याही आरोग्याच्या तक्रारीची माहिती दिली नव्हती. 6 ऑक्टोबर रोजी झालेल्या वैद्यकीय तपासणीतही त्याने कोणत्याही आजाराची किंवा आरोग्यविषयक समस्येची तक्रार केली नव्हती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेनंतर बेलापूर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, पंच साक्षीदार आणि मृताच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत व्हिडिओ चित्रीकरणाद्वारे पंचनामा करण्यात येणार आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
तुझी बायको मला आवडते, तू तिला विसरून जा, नाहीतर…; नाशिकमधील धक्कादायक प्रकार
दरम्यान, महाराष्ट्रात पोलिस किंवा सुरक्षा यंत्रणेच्या ताब्यात मृत्यू झाल्याची ही अलीकडील दुसरी घटना आहे. यापूर्वी 22 सप्टेंबर रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) ताब्यात एका 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून करण्यात येत होती.
मृत इमरान शेख हा रोजगाराच्या शोधात मध्य प्रदेशातील खंडवा येथून मुंबईत आला होता. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 20 सप्टेंबर रोजी त्याने सीएसएमटी येथील आरपीएफच्या मुख्य चौकीत खंडव्याला जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची माहिती विचारली होती. त्यावेळी तो घाबरलेल्या अवस्थेत दिसत होता आणि काही जण आपल्याला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत होता. त्यानंतर तो आक्रमक झाला आणि त्याने आरपीएफचे उपनिरीक्षक अनिकेत यांच्यावर हल्ला केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याने स्वतःलाही दुखापत करून घेतली होती.






