अरबी समुद्रात कोचीच्या किनारपट्टीजवळ शनिवारी तब्बल 12 हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज (Drugs) जप्त करण्यात आले. एनसीबी (NCB) आणि भारतीय नौदलाने (Indian Navy) मागच्या वर्षीपासुन ‘समुद्रगुप्त’ ऑपरेशन (Samudrgupta) संयुक्तरीत्या सुरू केलं होत. या अंतर्गत आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. या कारवाईत ‘मेथामफेटामाइन’ ड्रग्जचा अडीच हजार किलोचा साठा जप्त केला. तसेच एका संशयित पाकिस्तानी नागरिकाला ताब्यात घेतले.
[read_also content=”अनेकदा हल्ला होऊनही न घाबरले ना माघार घेतली, ‘या’ कर्तव्यदक्ष पोलिसाने एका वर्षात पकडले 80 गुन्हेगार https://www.navarashtra.com/crime/head-constable-in-wazirabad-police-station-have-caught-80-criminals-in-one-year-nrps-399144.html”]
यासोबतच NCB उपमहासंचालक (Ops) संजय कुमार सिंह यांनी शनिवारी सांगितले की, NCB आणि भारतीय नौदलाने हिंदी महासागरात एक ऑपरेशन केले, ज्यामध्ये मूल्याच्या दृष्टीने सर्वात मोठी जप्ती करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचा स्रोत पाकिस्तान आहे. ही औषधे इराणमधील चाबहार बंदरातून आली आहेत.
कारवाईत जप्त केलेल्या ड्रग्जच्या पाकिटांवर ‘हाजी दाऊद ऍण्ड सन्स’ आणि ‘मेड इन पाकिस्तान’ लिहिल्याचे आढळले आहे. हा ड्रग्ज साठा हिंदुस्थानसह श्रीलंका आणि मालदीवला पाठवला जाणार होता. बलुचिस्तानच्या मकरान किनाऱयावरून ‘मेथामफेटामाइन’चा साठा घेऊन जहाज निघाल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे जहाजाच्या हालचालींवर पाळत ठेवून अखेर कोचीच्या किनारपट्टी भागात जहाजावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात 12 हजार कोटींचा ‘मेथामफेटामाइन’चा साठा हाती लागला.
भारतीय नौदलाव्यतिरिक्त, एनसीबीने ऑपरेशन समुद्रगुप्त संदर्भात श्रीलंका आणि मालदीवसोबतही काम केले. एकमेकांशी माहिती सामायिक केली गेली, ज्यामुळे श्रीलंकेच्या नौदलाने डिसेंबर 2022 आणि एप्रिल 2023 मध्ये दोन ऑपरेशन केले. यामध्ये 286 किलो हेरॉईन आणि 128 किलो मेथाम्फेटामाइन जप्त करून 19 ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली. त्याच वेळी, मार्च 2023 मध्ये, मालदीव पोलिसांनी 4 किलो हेरॉईन जप्त करताना 5 तस्करांना अटक केली.
संजय कुमार म्हणाले की, आम्ही फेब्रुवारी 2022 मध्ये ऑपरेशन समुद्रगुप्त सुरू केले. या कारवाईअंतर्गत या पथकाने आतापर्यंत सुमारे चार हजार किलो विविध प्रकारचे ड्रग्ज जप्त केले आहेत. या कारवाईत, प्रथम फेब्रुवारी 2022 मध्ये, NCB आणि भारतीय नौदलाच्या संयुक्त पथकाने गुजरातच्या किनारपट्टीवरून 529 किलो चरस, 221 किलो मेथॅम्फेटामाइन आणि 13 किलो हेरॉईन जप्त केले होते. हे ड्रग्ज बलुचिस्तान आणि अफगाणिस्तानमधून आणले होते. एका संशयित पाकिस्तानी नागरिकालाही ताब्यात घेण्यात आले. यानंतर, ऑक्टोबर 2022 मध्ये, संयुक्त पथकाने केरळच्या किनारपट्टीवर एक इराणी बोट अडवली, ज्यामधून एकूण 200 किलो उच्च दर्जाचे हेरॉईन जप्त करण्यात आले. या कारवाईत 6 इराणी ड्रग्ज तस्करांनाही अटक करण्यात आली.