संग्रहित फोटो
पुणे : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. डेक्कन परिसरातील घोले रस्त्यावर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कारचालकावर डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रेणुकदास नारायण जोशी (वय ६५) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. याप्रकरणी मोटारचालकावर गु्न्हा नोंद केला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी योगेश जावळे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दुचाकीस्वार रेणुकदास जोशी १५ एप्रिल रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास झाशीची राणी चौकातून घोले रस्त्याकडे निघाले होते. झाशीची राणी चौकातील कोपऱ्यावर कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातात जोशी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक सावंत तपास करत आहेत.
या रस्त्यावर अपघाताचा धोका कायम
घोले रोड परिसरात मोठ्या प्रमाणात हॉटेल सुरू झालेले आहेत. त्यामुळे दिवसभर मोठी गर्दी व वाहनांची वर्दळ असते. यामुळे वाहतूक कोंडी देखील होते. झाशीची राणी चौकातील सिग्नल सुटल्यानंतर भरधाव वेगाने वाहने येतात. तर घोले रस्त्यावर असलेल्या हॉटेलमधून बाहेर पडणारे व आत जाण्यास आलेल्या नागरिकांची गर्दी असते. वाहने रस्त्यावरच उभे केलेले असल्याने प्रचंड गर्दी असते. वाहने कशीही उभा केल्याने पादचाऱ्यांना चालणे देखील कठीण होते. अचानक वाहने युटर्न घेत असल्याने अपघाताचा धोका असतो. त्यासोबत छोट्या गल्यांमधून वाहने रस्त्यावर येतात. त्यामुळे अपघाताचा धोका हा सातत्याने या रस्त्यावर असल्याचे दिसते.