दररोज 140 महिलांची हत्या, महिला स्वत: च्या घरात असुरक्षित (फोटो सौजन्य-X)
Crime against Women report: आधी निर्भया सामुहिक लैंगिक अत्याचार…मग कोलकात्याच्या डॉक्टरवर झालेला अमानुष अत्याचार…मग बदलापूरची घटना…एका मागोमाग एक समोर येणाऱ्या या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मुली आणि महिलांना नेहमीच त्यांच्या सुरक्षिततेची काळजी असते आणि अशा परिस्थितीत त्यांना एकट्याने घराबाहेर पडणे कठीण होते.
रात्रीच्या अंधारात त्यांना घरी जाताना त्यांच्या सुरक्षिततेची भीती वाटते, असे असाताना जगभरातील महिलांच्या सुरक्षेबाबत एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. घरात राहणाऱ्या विवाहित महिला आणि मुलींचा जीव धोक्यात असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. आकडेवारीनुसार 2023 मध्ये महिलांच्या हत्येच्या 60 टक्के प्रकरणांमध्ये गुन्हेगार त्यांचे पती किंवा कुटुंबातील सदस्य असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
युनायटेड नेशन्सच्या या अहवालात असे समोर आले आहे की, दररोज 140 महिलांची हत्या त्यांच्याच पतीकडून झाल्याचं समोर आला. अहवालानुसार, 2023 मध्ये पुरुषांनी मारलेल्या 85,000 महिलांपैकी 51,100 महिलांची हत्या त्यांच्या जवळच्या लोकांनी केली होती. अभ्यासातून असे दिसून आले आहे की महिलांसाठी सर्वात धोकादायक ठिकाण त्यांचे हक्काचे घर ठरले आहे.
यूएन वुमनच्या उपकार्यकारी संचालकांनी सांगितले की, ही आकडेवारी महिलांच्या जीवनासाठी किती भीषण परिस्थिती आहे हे दर्शवते. अहवालात असेही म्हटले आहे की, महिलांना घरामध्ये गंभीर हिंसाचाराचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांचा जीवही जाऊ शकतो.
UN च्या अहवालात स्त्रीहत्या ही लिंग-संबंधित हत्या अशी व्याख्या करण्यात आली आहे. आकडेवारी दर्शवते की 2022 पर्यंत महिला आणि मुलींच्या हेतुपुरस्सर मृत्यूच्या संख्येत एकंदर घट झाली आहे. मात्र जिवलग जोडीदार आणि कुटुंबीयांकडून महिलांच्या हत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
अहवालानुसार, 2023 मध्ये आफ्रिकेत 21,700 स्त्रीहत्येची प्रकरणे नोंदवली गेली, जी सर्वात जास्त आहे. यानंतर अमेरिका आणि ओशनियाचा क्रमांक लागतो. अगदी युरोप-अमेरिकेतही महिलांच्या जिवलग जोडीदाराकडून हत्या होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. सुरक्षित ठिकाण असले पाहिजे असे घर महिलांसाठी सर्वात मोठा धोका ठरत असल्याचा निष्कर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने काढला आहे. हा अहवाल केवळ स्त्री-पुरुष समानतेवरच प्रश्न उपस्थित करत नाही, तर समाजातील महिलांबद्दलची विचारसरणी आणि दृष्टिकोन बदलण्याची नितांत गरजही दाखवतो.