सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद घातला असून, राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालकांच्या मेव्हण्याचा बंद घर फोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून, यासोबतच आणखी दोन फ्लॅटदेखील फोडण्यात आले आहेत. तर चोरट्यांनी शहरातील विश्रांतवाडी, धनकवडी तसेच मार्केटयार्ड परिसरातही फ्लॅट फोडले आहेत. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, बाणेर भागात मध्यरात्री अमोल बाळासाहेब लोखंडे (वय ३४) तसेच मनोहर चौधरी (रा. बाणेर गावठाण, भैरवनाथ मंदिराजवळ) यांचेही सोमवारी मध्यरात्री फ्लॅट फोडण्यात आले आहेत. याप्रकरणात बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे. जवळपास १० ते १२ तोळे सोने व रोकड चोरून गेल्याची माहिती देण्यात आली आहे.
निवृत्त पोलीस महासंचालक यांचा मेव्हणा चतु:श्रृंगी परिसरात राहतात. ते बाहेर गावी असतात. अधून-मधून येतात. त्यांचा फ्लॅट बंद असताना चोरट्यांनी तो सोमवारी रात्री फोडण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच औंधमधील लोखंडे व चौधरी यांचाही फ्लॅट फोडला आहे. यासोबत विश्रांतवाडीत साप्रस पोलीस चौकीजवळील एका सोसायटीतील बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी पावणेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून विश्रांतवाडी पोलिसांत अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. १९ ते २२ नोव्हेंबर या काळात ही घटना घडली. तक्रारदारांच्या नातेवाईकांच्या घरी लग्नकार्य होते. त्यासाठी तक्रारदार कुटुंबीयांसह बीडला गेले होते. तेव्हा चोरट्यांनी कुलूप उचकटून आत प्रवेशकरत दोन लाख ६८ हजारांचा ऐवज चोरून नेला. तक्रारदार लग्नावरून परतल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला.
धनकवडीतील बंद फ्लॅट फोडला
घराला कुलूप लावून बाहेर गावी गेल्यानंतर धनकवडीतील बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडण्यात आला आहे. चोरट्यांनी येथून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी ५० वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यावरून सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १२ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत घडली आहे. चैतन्यनगर परिसरातील हिल व्ह्यु अपार्टमेंटमध्ये तक्रारदार राहतात. त्यांचा फ्लॅट १३ ते १४ दिवसांसाठी बंद होता.
हे सुद्धा वाचा : पुण्यात मोठा दरोडा टाकण्याचा प्लॅन फसला; ‘चूहा गँग’च्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
मार्केटयार्ड पोलीस ठाण्यापासून सुमारे सहाशे ते आठशे मीटर अंतरावरील गणत्र कॉम्प्लेक्स येथे चोरट्यांनी घरफोडी करून ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी ३२ वर्षीय तरुणाने मार्केटयार्ड पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारदाराच्या भावाचे राहत्या घरात २४ नोव्हेंबरला कोणी नव्हते. त्यामुळे दरवाजाला कुलूप होते. २५ नोव्हेंबरला सकाळी सव्वासहाच्या सुमारास घरफोडीचा प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून रोख रक्कम व सोन्याची अंगठी असा ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.