फोटो सौजन्य - सोशल मिडीया
महाडिकवाडी येथील सरदार ऊर्फ बापू महाडिक यांच्या घरी १२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री एक ते दोनच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केला. घरातील ८० वर्षीय वृद्ध महिलेचे तोंड व हात पांढऱ्या कापडी पट्ट्यांनी बांधून तिच्या अंगावरील सोन्याच्या पाटल्या, मंगळसूत्र, कुड्या आणि बुगडी असा सुमारे पाच लाख रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने काढून नेला. या घटनेत वृद्ध महिला जखमी झाली होती. याप्रकरणी पन्हाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी परिसरासह आजूबाजूच्या गावांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून संशयितांच्या हालचालींचा माग घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, गुन्ह्याच्या वेळी कोणतीही संशयित गाडी किंवा बाहेरील व्यक्ती परिसरात आल्याचे स्पष्ट झाले नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय स्थानिक व्यक्तींकडे वळला.
तपासादरम्यान मिळालेल्या स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी नंदकिशोर महाडिक याच्याकडे चौकशी केली. सुरुवातीला त्याने गुन्ह्यातील सहभाग नाकारला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मोबाईलमधील व्यवहारांची बारकाईने तपासणी केली. त्यावेळी ७ सप्टेंबर रोजी एका कापड दुकानात ‘फोन पे’द्वारे पैसे अदा केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
यानंतर पोलिसांनी संबंधित कापड दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. नंदकिशोरने दुकानातून खरेदी केलेले कापड आणि चोरीच्या ठिकाणी वृद्ध महिलेचे हात व तोंड बांधण्यासाठी वापरण्यात आलेले कापड यामध्ये साम्य असल्याचे तपासात आढळले. हा तपासातील महत्त्वाचा धागा ठरला. उपलब्ध पुरावे समोर ठेवल्यानंतर नंदकिशोरने रमेश महाडिक याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी रमेश महाडिक यालाही ताब्यात घेतले. दोघांकडून चोरीस गेलेले पाच तोळे वजनाचे सुमारे पाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास श्रेणी पोलिस उपनिरीक्षक सुरेश खोत करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि शाहूवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलिस निरीक्षक लिंगाप्पा चौखंडे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. श्रेणी पोलिस उपनिरीक्षक सलीम सनदी, सुरेश खोत, समीर मुल्ला, तौसिफ मुल्ला, शंकर पाटील, सचिन पाटील, प्रकाश पाटील, रविंद्र कांबळे, गणेश पाटील, दिगंबर चिले, सागर रोहिले आणि अमर चव्हाण यांच्या पथकाने तपासात सहभाग घेतला.






