पुण्यात हनीट्रॅपचा गुन्हा (फोटो- istockphoto)
पुणे: पुनर्विवाह करण्यासाठी इच्छूक असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून पोलीसांची भिती दाखवून चोरट्यांनी ७२ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ६० वर्षीय नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, मनीषा शर्मा, विक्रम राठोड, राहुल शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार ज्येष्ठ नागरिक असून, ते कर्वेनगर भागात राहायला आहेत. त्यांचा घटस्फोट झालेला आहे. ते पुनर्विवाह करण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी एका साईटवर विवाह नोंदणी केली होती. चोरट्यांनी त्यांना एक फॉर्म पाठविला. फॉर्ममध्ये त्यांना वैयक्तिक माहिती भरण्यास सांगितले. नंतर मनीषा शर्मा असे नाव सांगणार्या महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला. त्यातून व्हिडीओ कॉल रेकॉर्डींग केले. व्हिडीओ रेकॉर्डींगच्या माध्यमातून शर्माने सोशल मिडीयात ते रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच, तातडीने पैसे भरण्यास सांगत त्यांना हनीट्रॅपमध्ये घेरले.
शर्माचा साथीदार विक्रम राठोडने तक्रारदारांशी संपर्क साधला. दिल्ली पोलीस दलातून बोलत असल्याचे सांगत त्यांना धमकावले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तर, साथीदार राहुल शर्माने त्यांच्याशी संपर्क साधला. सोशल मिडीयात व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यांना दबाव टाकत बँक खात्यात ७२ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. घाबरलेल्या ज्येष्ठाने त्याच्या बँक खात्यात पैसे जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक संगीता रोकडे तपास करत आहेत.
सायबर चोरट्यांकडून ४२ लाखांची फसवणूक
सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत दोघांची ४२ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी कोथरूड आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. याबाबत ६५ वर्षीय व्यक्तीने कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारदार तरुणाला शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून चोरट्यांनी ३२ लाख ५६ हजार रुपयांची फसवणूक केली. भारती विद्यापीठ परिसरातील एकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने १२ लाख ८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला.
कारच्या धडकेत पादचार्याचा मृत्यू
भरधाव कार धडकेत पादचार्याचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या कार चालकाविरूध्द लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विष्णू हरी भटोराय (वय ४७, सध्या रा. वाडे गाव, ता. शिरुर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबत लोकबहाद्दुर नरबिक (वय ३७) यांनी लोणीकंद (वाघोली) पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. भटोराय आणि नरबिक मित्र आहेत. दोघे जण मजूरी करतात. 8 डिसेंबर रोजी भटोराय आणि नरबिक नगर रस्त्यावरील वाघोली परिसरातून रात्री आठच्या सुमारास निघाले होते. कटकेवाडी परिसरातील हॅाटेल शौर्यवाडा समोर भरधाव कारने भटोराय यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या भटोराय यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अशी माहिती पोलिसांनी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजीतवाड तपास करत आहेत.