संग्रहित फोटो
बुलढाणा : बुलढाणाच्या देऊळगाव राजामध्ये खळबळजनक घटना घडली आहे. देऊळगाव राजामध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याची हत्या झाली आहे. पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. कर्मचाऱ्याची हत्या नेमकी कशामुळे झाली, याचा तपास पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे. कर्मचाऱ्याच्या हत्येमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाण्यातील देऊळगाव राजा ते सिंदखेड राजा मार्गावरील गिरोली खुर्द शिवारात ज्ञानेश्वर म्हस्के या पोलीस कर्मचाऱ्याचा त्याच्याच गाडीत गळा आवळून खून केल्याचे पोलिसांनी प्राथमिक दर्शनी केलेल्या तपासता सिद्ध झाले. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी डॉग स्कॉड, फिंगर प्रिंट पथक, गुन्हे शाखेने जाऊन पंचनामा केला. त्या दिशेने तपास सुरू केला आहे.
तीन संशयितांना घेतले ताब्यात
हत्याप्रकरणी तीन संशयित ताब्यात घेतले आहेत. त्यांच्याकडूनही हत्येचा काही उलगडा होऊ शकतो का, या दुष्टीने सुद्धा पोलिस तपास करत आहेत. म्हस्के यांचा मृतदेह त्याच्याच गाडीत आढळला आहे. गाडी लिंबाच्या झाडाला लावून दिली होती. अपघात झाल्याचे आरोपींनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मृत म्हस्के हे जालना पोलिस दलात कार्यरत होते. शनिवारी सायंकाळी घरी आलेले होते.
जमिनीच्या वादातून चुलत भावानेच संपवलं
वडिलोपार्जित असलेल्या शेत जमिनीवरून जुना वाद होता. हा वाद उफाळून आल्याने चुलत भावाने हत्याराने वार करत आपल्या भावाची हत्या केल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी शिवारातून समोर आली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एकाला ताब्यात घेण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी येथील सुनील रामसिंग चव्हाण (वय ३२) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुनील चव्हाण हा शेती आणि मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करत होता.