Maharashtra Breaking News
30 Aug 2025 02:13 PM (IST)
देशातील आघाडीच्या वाहन उत्पादकांपैकी एक असलेली टाटा मोटर्स अनेक सेगमेंटमध्ये वाहनं ऑफर करते. टाटाने अलीकडेच कमर्शियल व्हेईकल सेगमेंटमध्ये Tata Winger Plus लाँच केली आहे.पर्यटक आणि कर्मचाऱ्यांची वाहतूक आरामदायी व्हावी यासाठी कंपनीने हे वाहनं लाँच केले आहे. हे वाहन मोनोकोक चेसिसवर बनवले आहे जे त्याला उत्तम सुरक्षा आणि स्थिरता देते. Tata Winger Plus ची भारतातील एक्स-शोरूम किंमत 20.60 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
30 Aug 2025 01:55 PM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर टॅरिफ धोरणामुळे जागतिक राजकारणात नवे समीकरण तयार होत आहेत. भारतावर 50 टक्के कर लादल्यापासून या भू-राजनैतिक पटावर एकाच वेळी दोन वेगवेगळे गट निर्माण होऊ लागले आहेत. एकीकडे रशिया–भारत–चीन या त्रिकुटाचा प्रभाव दिसतोय, तर दुसरीकडे भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया अशी स्वतंत्र युती तयार होण्याची चिन्हे आहेत. या नव्या घडामोडी इंडो-पॅसिफिक प्रदेशातील सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तुळात वर्तवली जात आहे.
30 Aug 2025 01:50 PM (IST)
गोकुळ दूध संघाने स्थापनेपासून नेहमीच दूध उत्पादकांच्या हिताचे धोरण अवलंबले असून, त्यांचा विश्वास जपणे हेच आपले ध्येय राहिले आहे. दूध उत्पादकांच्या श्रमाला योग्य मोबदला मिळावा, दूध उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे दूध संस्था व संस्था कर्मचारी सक्षम व्हावेत आणि दुग्ध व्यवसाय अधिक बळकट व्हावा, यासाठी गोकुळ सातत्याने नवे निर्णय घेत असतो. त्यात आता कंपनीने म्हैस-गायीचे दूध एक रुपयाने महागले आहे.दूध उत्पादकांना आर्थिक दिलासा देण्याच्या हेतूने संघाशी संलग्न म्हैस व गाय दूध उत्पादकांना दूध संकलन वाढवण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून संघाने दरवाढ केली आहे. सध्याचे म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्ये प्रतिलिटर एक रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, जिल्ह्यातील म्हैस दूध खरेदी दरामध्ये ६.० फॅट व ९.० एस.एन.एफसाठी प्रतिलिटर रुपये ५०.५० वरून रूपये ५१.५० करण्यात आला आहे.
30 Aug 2025 01:45 PM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा एकदा मोठ्या कायदेशीर संकटाचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेच्या एका संघीय अपील न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या निर्णयात ट्रम्प प्रशासनाने विविध देशांवर लादलेले बहुतेक आयात शुल्क कायद्यानुसार बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले आहे. या निकालामुळे ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांना धक्का बसला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे राजकीय समीकरण अधिक गुंतागुंतीचे होण्याची शक्यता आहे.
30 Aug 2025 01:35 PM (IST)
रिझर्व्ह बँकेच्या ताज्या बुलेटिननुसार, भारतातील महत्त्वाकांक्षी मध्यमवर्गीयांमध्ये, विशेषतः गुंतवणूकीचा एक मार्ग म्हणून म्युच्युअल फंड हे पारंपारिक बँक ठेवींना एक मजबूत पर्याय बनत आहेत. मार्च २०२४ रोजी संपलेल्या १० वर्षांच्या कालावधीत म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) आणि एकूण बँक ठेवींचे प्रमाण दुप्पट झाले आहे, जे १० टक्क्यांवरून २३.८ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे, असे केंद्रीय बँकेने नमूद केले.सध्या, म्युच्युअल फंडांचा AUM बँक ठेवींच्या सुमारे एक तृतीयांश आहे. फ्रँकलिन टेम्पलटन फंडच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की मे २०२५ मध्ये निधीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता ७२.२ लाख कोटी रुपये होती, जी २३१.७ लाख कोटी रुपयांच्या बँक ठेवींच्या सुमारे ३१.२ टक्के आहे.
30 Aug 2025 01:25 PM (IST)
दिल्ली प्रीमियर लीग म्हणजेच डीपीएल २०२५ चा एलिमिनेटर सामना दक्षिण दिल्ली आणि पश्चिम दिल्ली यांच्यात खेळला गेला. या सामन्यात धावांचा पाऊसच पडला नाही तर खेळाडूंमधील हाणामारीनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एकीकडे नितीश राणा आणि दिग्वेश राठी यांच्यात जोरदार वाद झाला. या दोघांचा वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या दोघांमध्ये कडाक्याचा वाद त्याचबरोबर शिवीगाळ देखील झाला होता त्यानंतर इतर मैदानामधील खेळाडू हे दोघांना रोखण्यासाठी आले होते
30 Aug 2025 01:15 PM (IST)
ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी राज्यभरातील मराठा आंदोलक मुंबईत पोहोचले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक कितीही दिवस मुंबईत राहण्यास तयार आहेत. आरक्षण मिळेपर्यंत ते मुंबई सोडणार नाहीत अशी भावना मराठा समाजाने व्यक्त केली आहे. राजकीय क्षेत्रासह आता मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणासंदर्भात मनोरंजनविश्वातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याचदरम्यान आता अभिनेता रितेश देशमुख यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे.
30 Aug 2025 01:10 PM (IST)
फडणवीस सरकारने मराठा आंदोलनाला एक दिवसाची मुदतवाढ दिली म्हणजे मेहरबाणीचं केली असं म्हणायला हवं, मराठी माणसं मोठ्या संख्यने आले आहेत. शांततेत आंदोलन करत आहे, हे बहुतेक सरकाराला पाहवत नाहीये. मुंबई हजारोंच्या संख्येने एकवटली आहे. त्याचा कोणाला त्रास होतोय का, काही धनिक भाजपचे समर्थक, त्यांचे धनी, भाजपला मदत करणारे व्यापारी, यांना या आंदोलनाचा त्रास होतोय का, यांना त्रास होत असेल त्यांमुळे सरकारने मराठा आंदोलनाला एक-एक दिवसाची मुदतवाढ दिली असावी, अशी टीका ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
30 Aug 2025 01:05 PM (IST)
सध्या मध्यपूर्वेत अस्थिरतेचे वातावरण आहे. येमेनच्या हुथी बंडखोरांसोबत इस्रायलच्या संघर्षाने विध्वंस घडत आहे. नुकतेच इस्रायलने २८ ऑगस्ट रोजी साना येथे हुथी बंडखोरांवर हल्ले केले होते. या हल्ल्यात हुथी विद्रोह्यांच्या पंतप्रधान अहमद अल-राहवी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.तसेच हुथींचे संरक्षण मंत्री मोहम्मद अल-अती आणि चीफ ऑफ स्टाफ मोहम्मद अब्द अल-करी अल-घमारी यांनाही लक्ष्य करण्यात आले होते. मात्र अद्याप त्यांच्या मृत्यूची पुष्टी झालेली नाही.
30 Aug 2025 01:03 PM (IST)
जम्मूच्या रियासी जिल्ह्यातील माहोर भागात मोठा भूस्खलन झाला असून अनेक घरे वाहून गेली आहेत. सुमारे सात लोक बेपत्ता आहेत. त्याचवेळी, रामबन जिल्ह्यातील राजगड भागातही भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले असून येथे तीन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे आणि दोन जण बेपत्ता आहेत. प्रशासन आणि बचाव पथक सध्या मदत कार्यात व्यस्त आहेत. या दुर्घटनेत दोन घरे आणि एका शाळेचे नुकसान झाले आहे.
30 Aug 2025 01:00 PM (IST)
नागपूर शहरात एका शाळकरी मुलीची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतून घरी जात असतांना तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलमोहर कॉलनीत हत्या झाली आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांना आहे. मृत मुलगी दहाव्या वर्गात शिक्षण घेत असल्याचे समोर आलं आहे. या घटनेने नागपूर शहर हादरलं आहे.
30 Aug 2025 12:58 PM (IST)
जगदीप धनखड यांनी राजस्थान विधानसभेत पेन्शनसाठी अर्ज केला आहे. अजमेर जिल्ह्यातील किशनगड मतदारसंघाचे आमदार असल्याने त्यांना राज्य विधानसभेतून मासिक पेन्शन मिळण्याचा अधिकार आहे. विधानसभा सचिवालयाने त्यांचा अर्ज मिळाल्याची पुष्टी केली आहे आणि नियमांनुसार प्रक्रिया सुरू आहे. धनखड सध्या ७४ वर्षांचे आहेत. राजस्थानच्या नियमांनुसार त्यांना दरमहा सुमारे ४२ हजार रुपये पेन्शन मिळण्याची शक्यता आहे.
30 Aug 2025 12:53 PM (IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बाप्पाची आरती केल्यानंतर अमित शाह लालबागच्या राजाचे दर्शनासाटी पोहचले आहेत. अमित शाहा यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि चिरंजीव जय शाह, देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण देखील उपस्थित आहेत.
30 Aug 2025 12:50 PM (IST)
धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीडजवळील नमालगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज सकाळी आठच्या सुमारास झाली आहे.
30 Aug 2025 12:40 PM (IST)
नाशिकमध्ये बैल पोळा सणाच्या दिवशी नांदूर नका येथे दोन गटात हाणामारी झाली होती. माजी नगरसेवक भाजप नेते उद्धव निमसे आणि धोत्रे या दोन गटात हाणामारी झाली होती. यात निमसे गटाने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या राहुल धोत्रेचा आज शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यात हाणामारीचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते.
30 Aug 2025 12:27 PM (IST)
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातून मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या 2.65 कोटी रुपयांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत तब्बल 30 ते 35 जुगारींना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पोलिसांनी 16 लाख रुपयांची रोकड, 87 वाहने आणि 62 मोबाईल जप्त केले आहेत. ही कारवाई सांगोला तालुक्यातील मोठी कारवाई आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
30 Aug 2025 12:12 PM (IST)
मराठ्यांना अन्न, पाणी मिळू देत नाही, मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना वेठीस धरू नका, असा इशारा मनोज जरांगेंचा यांनी दिला. शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन त्यांनी केले. महापालिकेचा रस्ता रिकामा करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिला.
30 Aug 2025 12:08 PM (IST)
अमित शाह मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत मराठा आरक्षण आणि महापालिका निवडणुकांच्या तयारीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत भाजपचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम हेदेखील उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे.
30 Aug 2025 12:05 PM (IST)
गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्री फडणवीसांच्या शासकीय बंगल्यावर दाखल झाले असून त्यांच्या हस्ते फडणवीसांच्या घरातील गणपती बाप्पाची आरती कऱण्यात आली.
30 Aug 2025 11:57 AM (IST)
भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा पुण्यात दाखल झाले आहेत. पुणे विमान तळावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचे स्वागत केले. पुण्यातील प्रमुख गणेश मंडळाना नड्डा आज भेटी देणार आहेत. शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या गणपतींचे दर्शन घेणार आहे.
30 Aug 2025 11:35 AM (IST)
काल सायंकाळी खामगाव व परिसरात दीड तास मुसळधार पावसाने कहर केला. खामगाव शहरातील घाटपुरी नाका परिसरात नगर परिषदेने अनेक महिन्यांपासून नाली खोदून ठेवली आहे. मात्र त्याचं काम अपूर्ण सोडून ठेकेदार फरार झाला. यामुळे मात्र पावसाचे पाणी थेट दुकानांमध्ये शिरलं, काही दुकानांमध्ये तर दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी शिरल्याने व्यावसायिकांचं लाखो रुपयांचे नुकसान झालं. यावेळी तात्काळ राष्ट्रवादीचे नेते दिलीप कुमार सानंदा यांनी पंप सेट बोलवून हे पाणी उपसून देण्यास मदत केली व व्यवसायिकांना धीर दिला. मात्र नगरपरिषद प्रशासनाचा कुणीही अधिकारी किंवा कर्मचारी या ठिकाणी न पोहोचल्याने व्यवसायिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला होता.
30 Aug 2025 11:24 AM (IST)
रोजच्या आहारात वापरला जाणारा टोमॅटो काही दिवसापूर्वी पन्नास रुपये किलोने विक्री होत होता यामुळे सामान्य कुटुंबियांच्या किचन मध्ये टोमॅटोचा वापर काही प्रमाणात घटले होते मात्र नंदुरबार बाजार समिती टोमॅटोची आवक वाढल्याने टोमॅटो किरकोळ बाजारात दहा रुपये किलोने विक्री होत आहे.या दरघसरणीचा सर्वाधिक फटका नंदुरबार तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांनी टोमॅटो वर केलेला खर्च आणि वाहतुकीच्या खर्च देखील निघणं आता कठीण होत आहे.
30 Aug 2025 11:06 AM (IST)
ओबीसींची आरक्षण काढून आम्हाला नको,ओबीसीतून आम्हाला आरक्षण द्या, असे मनोज जरांगे म्हणाले. फडणवीसांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे, आरक्षणाबाबत त्यांना राजकारण करायचे आहे, असा आरोप जरांगे यांनी केला.
30 Aug 2025 10:55 AM (IST)
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लाडकी आणि बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल आणि तिचा एक्स पती भरत तख्तानी यांच्या घटस्फोटानंतर, अलीकडेच दोघांना एकत्र पाहिल्यानंतर पुन्हा ते एकत्र येत असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. पण आता भरतच्या नवीन फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.
30 Aug 2025 10:50 AM (IST)
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन मुंबईतील आझाद मैदानावर केले जात आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हजारो मराठा बांधव आझाद मैदानावर दाखल झाले आहे. हे आंदोलन सुरु असताना राज्य सरकारकडून आता शासन अध्यादेश काढण्यात आला. सरकारच्या या जीआरमुळे मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळणं सोपं होणार आहे.
30 Aug 2025 10:44 AM (IST)
30 ऑगस्ट रोजी दरवर्षी जगभरात आंतरराष्ट्रीय व्हेल शार्क दिन साजरा केला जातो. हा दिवस केवळ एका प्रजातीसाठी नव्हे, तर संपूर्ण सागरी परिसंस्थेसाठी महत्त्वाचा आहे. कारण व्हेल शार्क हे जगातील सर्वात मोठे मासे असून ते समुद्राच्या आरोग्यासाठी अपरिहार्य भूमिका बजावतात. पण दुर्दैवाने, गेल्या काही दशकांपासून या सौम्य राक्षसांची संख्या चिंताजनक गतीने घटत आहे. संशोधक पियर्स आणि नॉर्मन यांच्या अभ्यासानुसार, मागील ७५ वर्षांत व्हेल शार्कची लोकसंख्या ५० टक्क्यांहून अधिक घटली आहे. म्हणूनच त्यांना आंतरराष्ट्रीय युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर (IUCN) च्या रेड-लिस्टमध्ये “धोक्यातील प्रजाती” म्हणून वर्गीकृत केले गेले आहे.
30 Aug 2025 10:43 AM (IST)
AMRAVATI | मोठा गाजावाजा करून अमरावती विमानतळावरून अमरावती ते मुंबई विमान सेवा सुरू झाली होती. मात्र अमरावती - मुंबई तसेच हैदराबाद "एअर अलायन्स" विमानसेवा तांत्रिक कारणामुळे २१ ऑगस्टपासून ठप्प झाली आहे. ‘ऑपरेशनल इश्यू’ या कारणाखाली सेवा थांबवण्यात आली असली तरी मोठा तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती पुढे आली आहे. एअर अलायन्सच्या ७२ एटीआर विमानाची युद्धस्तरावर दुरुस्ती सुरू असून १ किंवा १५ सप्टेंबरपासून सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी मात्र यावर टीका करत लवकर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत विमानसेवा लवकर सुरू करण्याची मागणी केली, तर लवकरच विमानसेवा सुरळीत होईल असा आश्वासन काल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे.
30 Aug 2025 10:35 AM (IST)
नितीश राणाने केवळ वादळी शतकच केले नाही तर नॉकआउट सामन्यात संघाला शानदार विजय मिळवून दिला आणि दिल्ली प्रीमियर लीगच्या क्वार्टरफायनल २ मध्ये नेले. तो दिल्ली प्रीमियर लीगमध्ये वेस्ट दिल्ली लायन्स संघाचे नेतृत्व करत आहे. २९ सप्टेंबर रोजी दिल्ली प्रीमियर लीगचा एलिमिनेटर सामना साउथ दिल्ली सुपरस्टार्स आणि वेस्ट दिल्ली लायन्स यांच्यात झाला. ज्यामध्ये नितीश राणाच्या संघाने ७ विकेट्सने शानदार विजय मिळवला. नितीश हा विजयाचा हिरो होता. एलिमिनेटरमध्ये त्याने फक्त ५५ चेंडू खेळले आणि नाबाद १३४ धावा केल्या. ज्यामध्ये ८ चौकार आणि १५ वादळी षटकारांचा समावेश होता.
30 Aug 2025 10:23 AM (IST)
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. निवडणुका तोंडावर असतानाच मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी कालपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केलं आहे. त्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. एकीकडे मनोज जरांगे यांच्या उपोषण सुरू असताना काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दाखल झाले. मुंबई महानगरपालिका म्हणजेच बीएमसी आणि राज्यातील इतर संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले.
30 Aug 2025 10:15 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडत आहेत. असे असताना आता गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात प्रेमसंबंध तोडल्याने संतप्त झालेल्या एका तरुणाने आपल्या एक्स गर्लफ्रेंडचा चाकूने गळा चिरून हत्या केली. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली.
30 Aug 2025 10:05 AM (IST)
मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोणाचेही नाव न घेता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काही राजकीय पक्ष आंदोलन करणाऱ्या जरांगे-पाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांचे स्वार्थ पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु ते यशस्वी होणार नाहीत.
30 Aug 2025 09:55 AM (IST)
धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीडजवळील नमालगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज सकाळी आठच्या सुमारास झाली आहे.
30 Aug 2025 09:45 AM (IST)
जंगलात शिकारीचा थरार दिसणे काही नवीन गोष्ट नाही. इथे जगायचं असेल तर शिकार ही करावी लागणारच. जंगलाचा राजा म्हणून सिंहाची ओळख आहे तर पाण्याचा राक्षस म्हणून मगरीला संबोधले जाते आता हे दोन शिकारी जेव्हा आमने-सामने येतात तेव्हा दृश्य थरारकतेने भरलेले असतेच. पण सध्याच्या व्हिडिओमध्ये मात्र चार सिंहांनी मात्र शिकारीचा चांगलाच डाव रचल्याचे दिसून आले. एकट्या चिमुकल्या मगरीला पाहून सिंहांचा कळप त्याला जंगलात घेरतात आणि मगरीच्या पिल्लाला चावून चावून त्याचा फडशा पडून टाकतात. मगरीचं पिल्लू स्वतःला सिंहाच्या विळख्यातून सोडवण्याचा खूप प्रयत्न करतो पण अखेर त्याचा शेवट लिहिलेलाच असतो… चला काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
30 Aug 2025 09:35 AM (IST)
नागपूर शहरात एका शाळकरी मुलीची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतून घरी जात असतांना तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलमोहर कॉलनीत हत्या झाली आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांना आहे. मृत मुलगी दहाव्या वर्गात शिक्षण घेत असल्याचे समोर आलं आहे. या घटनेने नागपूर शहर हादरलं आहे.
30 Aug 2025 09:25 AM (IST)
अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि यूएई यांच्यामध्ये ट्राय सिरीज खेळवली जात आहे. या मालिकेमध्ये ७ सामने खेळवले जाणार आहे. यामध्ये पहिले ६ सामन्यामध्ये जो संघ जास्त सामने जिंकले त्या संघांना फायनलचा सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. ट्राय सिरिजमधील पहिल्या टी-२० सामन्यात पाकिस्तानने उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर शानदार विजय मिळवला. युएईच्या शारजाह येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा ३९ धावांनी पराभव केला. वेगवान गोलंदाज हरिस रौफने घातक गोलंदाजी केली.
30 Aug 2025 09:15 AM (IST)
टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १९’ सुरू होताच चर्चेत आला आहे. या शोमधील टास्क आणि ट्विस्ट प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करत आहेत. सलमान खानचा शो सुरू होऊन जवळजवळ एक आठवडा झाला आहे आणि उद्या पहिला शनिवार म्हणजे पहिला वीकेंड का वार आहे. शोच्या पहिल्या आठवड्यात असे अनेक स्पर्धक आहेत ज्यांनी खूप लाइमलाइट चोरली आहे आणि बातम्यांमध्ये राहिले आहेत. चला जाणून घेऊया हे स्पर्धक कोण आहेत?
30 Aug 2025 09:05 AM (IST)
सन २०११ साली पालिकेने नव्याने बांधलेल्या पालिकेच्या इमारतीमध्ये यंदा प्रथमच गणेशाची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. पालिकेने यासाठी खास शाडुमातीची इकोफ्रेंडली गणरायाच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा केली आहे, याबरोबरच स्वच्छतेचे संदेश देणारे फलक लावण्यात आले असुन देखावा सादर करण्यासाठी वापरण्यात आलेल्या सर्व वस्तु या नैसर्गिक आहेत. पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांच्या मार्गदर्शनाखाली “माझी वसुंधरा अभियान ६.०” अंतर्गत पंचतत्त्वांवर आधारित पर्यावरणपूरक सजावट करण्यात आली आहे. या सजावटीत पृथ्वी, जल, अग्नी, वायु आणि आकाश या पाच नैसर्गिक तत्त्वांचा सुंदर संगम साकारण्यात आला आहे.
30 Aug 2025 09:00 AM (IST)
महाराष्ट्रासाठी शुक्रवारचा दिवस खूप महत्त्वाचा ठरला. राज्य सरकारने आज (२९ ऑगस्ट) विविध कंपन्यांसोबत जवळपास ३४,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी वेगवेगळ्या क्षेत्रांत १७ सामंजस्य करारांवर (MoU) स्वाक्षरी केली. या गुंतवणुकीमुळे राज्यात सुमारे ३३,००० नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
30 Aug 2025 09:00 AM (IST)
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या मुंबईच्या दौऱ्यावर असून, काल (शुक्रवारी) रात्री ते मुंबईत दाखल झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही ते आज लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत. यासोबतच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेणार आहेत. दरम्यान, अमित शाह यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. या चर्चेत राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न, बिहार विधानसभा निवडणुका तसेच उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत विचारविनिमय झाल्याचे बोलले जात आहे.
30 Aug 2025 08:55 AM (IST)
दिल्ली प्रीमियर लीग (DPL 2025) आता अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. काल झालेल्या एलिमिनेटर सामन्यात वेस्ट दिल्ली लायन्स आणि साऊथ दिल्ली सुपरस्टार्स यांच्यात चुरशीचा मुकाबला रंगला. दोन्ही संघांसाठी हा सामना निर्णायक होता. मात्र सामन्यात अनपेक्षित प्रकार घडला. वेस्ट दिल्लीचा नीतीश राणा आणि साऊथ दिल्लीचा दिग्वेश राठी हे भर मैदानातच आमने-सामने आले. या वादाची तीव्रता वाढल्याने पंच आणि खेळाडूंना हस्तक्षेप करून प्रकरण शांत करावं लागलं. या धक्काबुक्कीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, चाहत्यांमध्ये याची जोरदार चर्चा सुरू आहे.
30 Aug 2025 08:45 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरसह पंजाब, हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. या मुसळधार पावसामुळे जनजीवन अक्षरश: विस्कळीत झाले आहे. त्यात पंजाबमध्ये पुरामुळे कहर झाला आहे. हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरच्या सीमेवरील जिल्ह्यांमध्ये परिस्थिती खूपच बिकट असून, अनेक गावे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. येथे राहणारे लोकांना सध्या तात्पुरत्या छावण्यांमध्ये राहण्यास भाग पाडले जात आहेत.
30 Aug 2025 08:40 AM (IST)
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघावा यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षांसोबतच राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लवकरात लवकर निर्णय काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली. यापूर्वीही त्यांनी या प्रकरणी मध्यस्थी केली असल्याचे सांगून, आताही तोच प्रयत्न करून मार्ग काढण्याचा प्रयत्न होईल, असे धस यांनी स्पष्ट केले. मनोज जरांगेंची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
30 Aug 2025 08:35 AM (IST)
विरार पूर्वेतील रमाबाई अपार्टमेंट दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एक बिल्डर आणि जमीनमालकांचे चार नातलग अशा एकूण पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर एमआरटीपी कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम 105 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२६ ऑगस्ट २०२५ रोजी या चार मजली इमारतीचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या अपघातात १२ फ्लॅट्स जमीनदोस्त झाले, तर इमारतीतील एकूण ५० फ्लॅट्स आणि काही दुकाने धोक्यात आली. या घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला असून, नऊ जण जखमी झाले होते.
Marathi Breaking news live updates मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून तसेच सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाला सुरुवात केली. त्यांच्या सोबत हजारो मराठा बांधव उपस्थित होते. मात्र, मुंबईत कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आंदोलकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
काल रात्रीपासून दक्षिण मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून आझाद मैदानात सर्वत्र चिखल साचला आहे. अनेक ठिकाणी पाण्याचे डबके तयार झाले आहेत. मुंबई महापालिकेने शुक्रवारी मैदानातील खड्ड्यांवर खडी व वाळू टाकून दुरुस्ती केली होती. परंतु सततच्या पावसामुळे ती वाहून गेली असून मैदानात पुन्हा चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत आंदोलक आज दुसऱ्या दिवशी आंदोलन कसे सुरू ठेवणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.