सोलापूरच्या कुर्डुवाडीत मोठी घरफोडी; राहत्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडेचार लाखांचा ऐवज चोरला (संग्रहित फोटो)
कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील सोनके व जगतापनगरमध्ये घरफोडीची घटना घडली असून, यामध्ये अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण एक लाख १० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबत वाठार पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भूषण भरत धुमाळ (वय ३५, रा. पद्मावती रेसिडेन्सी, कामोठे, नवी मुंबई, मूळ रा. सोनके) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २३ जूनला मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या आणि भरत काशिनाथ जगताप (वय ५२, भांडुप ईस्ट, मुंबई, रा. जगताप नगर) यांच्या बंद अस लेल्या घरांचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. यामध्ये भूषण धुमाळ यांच्या घरातून सोन्याची चैन, अंगठ्या, गंठण, मिनी गंठण, पंचारती गणपती मूर्ती, आदी ऐवज व रोख सहा हजार रुपये असा एकूण ५८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
तर भरत जगताप यांच्या घरातून सहा सोन्याच्या नथ, चांदीचा छावा, करंडा, बाळी, आणि रोख आठ हजार ४०० रुपये असा एकूण ५० हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम यांनी भेट देऊन पाहणी कली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव अधिक तपास करत आहेत.
अकलूज येथे चोरीची घटना
दुसऱ्या एका घटनेत, सोलापूरच्या अकलूज येथे घरी कुणी नसल्याचे पाहून बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात दोन चोरट्यांनी दिवसाढवळ्या चार लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. ही घटना माळीनगर नजीकच्या सवत गव्हाण येथे सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणाची तक्रार अकलूज पोलिस ठाण्यात दाखल झाली असून, अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक झालेली नाही.