सौजन्य फोटो - AI Gemini
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली पाटोळे या जुन्या मोटार स्टँड परिसरात शेंगा आणि कणीस विक्रीची गाडी लावतात. शुक्रवारी (२ ऑक्टोबर) सायंकाळी आकाश घरी झोपला होता. झोपेतून उठल्यानंतर आंघोळ करून तो घरात बसला होता. त्याचवेळी त्याचे मित्र शंभू आणि अबिद घरी आले. त्यांच्यासोबत आकाश घराबाहेर पडला.
रात्री साडेआठच्या सुमारास काशेवाडीतील वजनकाट्याजवळील एका सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर आकाश रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडल्याचे एका स्थानिकाच्या निदर्शनास आले. त्याने याची माहिती रुपाली यांना दिली. रुपाली घटनास्थळी पोहोचल्या असता आकाश गंभीर जखमी अवस्थेत आढळला. त्याला तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
घटनेची माहिती देण्यासाठी रुपाली खडक पोलीस ठाण्यात गेल्या असता, त्याचवेळी आकाशचा मित्र अजय उर्फ चोर राजा स्वतःहून पोलीस ठाण्यात आला. नशा करताना आकाशसोबत वाद झाल्याचे आणि त्या वादातून त्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिल्याचे सांगण्यात आले. खून केल्यानंतर घरी जाऊन कपडे बदलले आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात हजर झाल्याचे अजयने पोलिसांना सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक राकेश जाधव करत आहेत.






