सौजन्य फोटो - AI Gemini
छतरपूर : सासऱ्यांची जमीन आपल्या नावावर करण्याच्या मागणीवरून पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांशी वाद घालणाऱ्या पतीने सुटकेनंतर अवघ्या दोन दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील छतरपूर येथे घडली. सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, पोलिसांनी आरोपी पतीसह त्याच्या साथीदाराला उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे.
लखन आणि ज्योती यांचे सुमारे दहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लखनला त्याच्या सासऱ्यांची जमीन आपल्या नावावर करून हवी होती. मात्र, ज्योतीच्या आई-वडिलांनी याला विरोध केला. यावरून लखनने सासरच्यांना मारहाण केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली होती. काही दिवसांनंतर लखनची सुटका झाली. मात्र, सुटकेनंतर अवघ्या दोन दिवसांतच त्याने पत्नी ज्योतीची हत्या केल्याचा आरोप आहे.
ज्योती सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भाड्याच्या घरात चार आणि सहा वर्षांच्या दोन मुलांसह राहत होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ती जवळच्या एका हॉटेलमध्ये वेट्रेस म्हणून काम करत होती. घटनेच्या दिवशी ज्योती घरातून चहापत्ती आणण्यासाठी बाहेर पडली होती. याच वेळी लखन एका साथीदारासह परिसरातील मुख्य रस्त्यावर आला. त्याने ज्योतीला अडवून तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.
लखनने ज्योतीला रस्त्यावर पाडून तिच्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर तिची गळा चिरून हत्या केल्याचा आरोप आहे. हा प्रकार भररस्त्यात घडल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. आरोपी छतरपूरमधून पसार झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी लखन आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले. मालमत्तेच्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक संशय असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.






