संग्रहित फोटो
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितु किशोरीलाल सरोज (वय ३०, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. पीडित तरुणी सुखसागर परिसरातील समर्थ डेअरीसमोर आपल्या मैत्रिणीची वाट पाहत थांबली होती. यादरम्यान, आरोपी तिथे आला आणि त्याने तरुणीची छेड काढत तिला थेट उचलून नेण्याचा प्रयत्न केला.
या संपूर्ण प्रकाराबाबत माहिती देताना पीडित तरुणी म्हणाली, “मी शनिवारी साडेसहाच्या सुमारास सुखसागर परिसरातील समर्थ डेअरीसमोर मैत्रिणीची वाट पाहत थांबले होते. तेव्हा तो तिकडे आला, माझ्या शेजारून फिरला आणि मला डायरेक्ट उचलून नेण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात माझी मैत्रीण तिकडे आली, तिने त्याला ढकललं, तेव्हा मी खाली पडले. पडल्यावर मला हाताला लागले. तरीही तो माझ्या मैत्रिणीला ढकलून मला उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. नंतर तिथे लोक जमा झाले, त्यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो त्यांनाही मारायचा प्रयत्न करत होता. तो अनोळखी होता, मी त्याला कधीही पाहिले नव्हते. त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. माझी मैत्रीण वेळेत आली म्हणून वाचले, नाहीतर तो मला उचलून घेऊन गेला असता.”
तरुणीच्या आरडाओरडीनंतर तिची मैत्रीण आणि आजूबाजूचे स्थानिक नागरिक तात्काळ मदतीला धावून आले. नागरिकांनी नराधम आरोपीला पकडून बेदम मारहाण केली. यावेळी आरोपीने एका व्यक्तीचा मोबाईलही जमिनीवर फेकून फोडला. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी जितु सरोज याला तात्काळ ताब्यात घेतले असून, याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. पु्ण्यासारख्या शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.






