अमली पदार्थांची तस्करी करणार्यांना पुणे पोलिसांचा दणका (संग्रहित फोटो)
पुणे : महाराष्ट्रात अमली पदार्थांची तस्करी करणार्या आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय टोळ्यांविरुद्ध राज्याच्या अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने (एएनटीएफ) धडक मोहीम उघडली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२६ या नऊ महिन्यांच्या कालावधीत १०५ आरोपींना अटक करण्यात आली असून, तब्बल १३ कोटी ९१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये १२ कोटी ११ लाख रुपयांचे अमली पदार्थ, तर १ कोटी ८० लाख रुपयांच्या इतर ऐवजाचा समावेश आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
यावेळी पत्रकार परिषदेला विशेष पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव आदी उपस्थित होते. टास्क फोर्सने राबविलेल्या मोहिमेत पुणे, नाशिक, नागपूर आणि नवी मुंबईतील अमली पदार्थ तस्करीची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. काही प्रकरणांचे धागेदोरे इतर राज्यांसह परदेशापर्यंत पोहोचल्याचे तपासात समोर आले आहे. पुण्यातील बाणेर येथील प्रकरणात आठ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यात तीन परदेशी नागरिकांचा समावेश आहे. तर, नाशिकमधील गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास राजस्थानच्या जोधपूरपर्यंत पोहोचला.
संयुक्त कारवाईत सहा जणांना अटक करण्यात आली. या कारवाईत ९८.८६ ग्रॅम आणि जोधपूरमधून एक किलो ९१२ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. नयानगर प्रकरणातही २७ आरोपींना मेफेड्रोनसह अटक करण्यात आली आहे. नागपुरात दोन स्वतंत्र कारवायांमध्ये तब्बल ५८२ किलो गांजा जप्त करण्यात आला. तर नवी मुंबईतील एका प्रकरणाचा तपास करताना बंगळुरूमध्ये मेफेड्रोन तयार करणारी फॅक्टरी कार्यरत असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणांमधून अमली पदार्थांची निर्मिती, वाहतूक आणि वितरण करणार्या साखळीचा शोध घेण्यावर पोलिसांनी भर दिला आहे.
जनजागृती आणि पोलिसांच्या प्रशिक्षणावर भर
अमली पदार्थांची विक्री आणि पुरवठा करणार्यांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच व्यसनाधीन व्यक्तींचे पुनर्वसन आणि जनजागृतीवरही टास्क फोर्सने भर दिला आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम, सीमावर्ती भागांत देखरेख आणि केंद्रीय तपास यंत्रणांशी समन्वय साधला जात आहे.
टास्क फोर्सकडून नियोजनबद्ध कारवाई
अमली पदार्थांची तस्करी करणार्या टोळ्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी टास्क फोर्सकडून नियोजनबद्ध कारवाई केली जात आहे. केवळ अमली पदार्थ जप्त करणे किंवा आरोपींना अटक करण्यापुरते मर्यादित न राहता, त्यांचे मुख्य सूत्रधार, निर्मितीचे स्रोत आणि पुरवठा साखळीपर्यंत पोहोचण्यावर भर दिला जात आहे.
– ज्योतिप्रिया सिंग, विशेष पोलीस महानिरीक्षक






