चंदन चोरांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई (फोटो- टीम नवराष्ट्र/ istockphoto)
पुणे: चंदन चोर अन् पोलिसांत झालेल्या धुमश्चक्रीत जखमी झालेल्या त्या दोन चंदन चोरांनी एका खासगी रुग्णालयात उपचार घेऊन ते पसार झाल्याचे उघडकीस आले आहे. आता पोलीस याची इंतभूत माहिती घेत असून, चंदन चोरांवर उपचार करणाऱ्या त्या डॉक्टरवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. तर या टोळीवर मोक्का कारवाई देखील होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
डेक्कन परिसरात चंदन चोर व पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये (बीट मार्शल) यांच्यात धुमश्चक्री झाल्याची घटना २२ ऑक्टोंबर रोजी घडली होती. चंदन चोरट्यांनी करवतीने हल्ला केल्यानंतर स्वरक्षणार्थ पोलीस कर्मचारी महेश तांबे यांनी चंदन चोरट्यांवर दोन गोळ्या झाडल्या होत्या. गोळीबारात शाहरुख कादीरखान पठाण, फारुखखान कादीरखान पठाण (रा. जंजाळ, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) हे चंदन चोर जखमी झाले. मात्र, दोघे व त्यांचे इतर ३ साथीदार फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
पुण्यात चंदन चोरीतील “विरप्पन” टोळ्यांची दहशत प्रचंड वाढली असून, चोरट्यांच्या वाढलेल्या हिमतींमुळे चंदन चोरीचा आलेख देखील वाढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ ८ महिन्यातच ३४ घटनांची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे. या चंदन चोर टोळक्यांचे धाडस इतके वाढले की आता नागरिकांवर हल्ले करण्यासोबतच त्यांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या देऊन चंदनाची झाडे चोरीला जात असल्याचे गेल्या काही घटनांमधून दिसत आहे.
पुण्यासारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या शहरात गाव गुंड, कुख्यात गुंड तसेच दहशतवाद्यांसोबत आता दाक्षिणात्य कुविख्यात चंदन तस्कर विरप्पनचे वारस असल्याची भितीदायक परिस्थिती गेल्या काही वर्षांमध्ये निर्माण झाली आहे. हे चंदन तस्करपुर्वी बंद बंगले, असुरक्षित ठिकाणांवरून गुपचूप चंदनाची झाडे करवतीने कापून चोरून नेत होते. पण, गेल्या काही महिन्यांपासून आता या चंदन चोरट्यांचे धाडस प्रचंड प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे.