संग्रहित फोटो
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता वारजे माळवाडी भागात घरफोडी करुन पसार झालेल्या कर्नाटकातील चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दुचाकी तसेच कटावणी, कटर, पाना असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
व्यंकटेश रमेश व्यंकी (वय २२, रा. गांधीनगर, चल्लाकेरे, जि. चित्रदुर्ग, कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ही कारवाई वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस कर्मचारी शिंदे, कुंभार, तांगडे, जाधव, शेलार यांनी केली.
व्यंकी हा मूळचा कर्नाटकातील आहे. तो परराज्यातून दुचाकीवर येऊन घरफोडीचे गुन्हे करत असल्याची माहिती वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर चित्ते आणि गणेश शिंदे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने कर्वेनगर भागात सापळा लावला. पोलिसांनी व्यंकीला सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली. दुचाकीची डिकी पोलिसांनी उघडली. डिकीत कटर, कटावणी, पाना, स्क्रु ड्रायव्हर सापडले. पोलिसांनी व्यंकी याची चौकशी केली. चौकशीत त्याने लोणीकंद, आंबेगाव, बावधन परिसरात घरफोडीचे गुन्हे केल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडे असलेली दुचाकी त्याने हडपसर भागातून चोरल्याचे उघड झाले आहे.