शिरूर तालुक्यातील शिंदोडीतून साडेसहा लाखांच्या मातीची चोरी; पोलिसांत गुन्हा दाखल होताच... (File Photo : Sand Smuggler)
शिक्रापूर : शिंदोडी (ता. शिरुर) येथील घोड धरण परिसरातून चक्क साडे सहा लाख रुपयांची माती चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, अशाप्रकारची घटना घडल्याने शिरुर पोलिसांत अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिंदोडी (ता.शिरुर) येथील घोडधरण जवळील जमीन गट नंबर २२३ व २१७ क्षेत्राच्या पूर्व बाजूला घोड धरणच्या क्षेत्रातून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने शासनाची कोणतीही परवानगी न घेता उत्खनन केल्याचे समोर आले. याबाबतची तक्रार शिरुर तहसील कार्यालाल्याकडे झाल्यानंतर मंडलाधिकारी यांसह आदींनी सदर परिसरात पाहणी करत पंचनामा केला असता कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बेकायादेशीपणे उत्खनन करत तब्बल सहा लाख 50 हजार रुपये किमतीची अंदाजे 400 ब्रास माती चोरी केल्याचे समीर आले.
याबाबत मंडलाधिकारी नंदकुमार संपतराव खरात (वय ४९, सध्या रा. बाबुराव नगर शिरुर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. पाडेगाव ता. फलटण जि. सातारा) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवलदार प्रताप टेंगले हे करत आहे.
कर्जत तालुक्यातही मातीची तस्करी
कर्जत तालुक्यातील ओलमन ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या कोतवाल वाडी परिसरात लाल माती तस्करीचा धक्कादायक प्रकार यापूर्वीच उघडकीस आला आहे. गेल्या दीड वर्षापासून स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर कोणतीही परवानगी न घेता, रात्रीच्या अंधारात डोंगर पोखरून लाल मातीची मोठ्या प्रमाणावर चोरी होत आहे. या तस्करीबाबत वन विभाग आणि महसूल विभाग दोघेही दुर्लक्ष करत असल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.