सौजन्य - नवराष्ट्र टीम
सासवड : राज्यात गुटखा मोठ्या प्रमाणात विक्री केला जात आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुटख्याच्या वाहतूकीवर कारवाई करण्यात येत आहे. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापुरवरून नारायणपूरमार्गे उरुळी कांचनकडे निघालेला गुटख्याने भरलेला १२ चाकी ट्रक सासवड पोलिसांनी पकडून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ६३ लाखांचा गुटखा आणि ३५ लाखाच्या ट्रकसह ९३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी कमलेशकुमार रामनरेश यादव (वय ४१, मुळ रा. हरीकापुरा पोस्ट कटारा, ता. जेठवारा, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश) आणि रणजीतकुमार हरीश्चंद्र पटेल (वय २३, मुळ रा. हनुमान गंज पोस्ट कल्याणपुर, ता. सोराव, जि. इलाहबाद, उत्तरप्रदेश, सध्या दोघेही रा. हडपसर, ता. हवेली, जि. पुणे) या दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिस हवालदार जब्बार हारून सय्यद यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की, पोलीस नाईक गणेश पोटे यांना ट्रकमधून गुटखा, पान मसाला, सुगंधीत तंबाखू विक्री करण्यासाठी नारायणपूरमार्गे सासवडकडे येत असल्याची माहिती मिळाली होती. याबाबत त्यांनी पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना माहिती दिली. त्यांनी पोलिस हवालदार जब्बार सय्यद आणि पोलिस हवालदार लियाकत मुजावर यांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांच्या पथकाने सासवड नारायणपूर रोडवर तपासणी केली असता एका ट्रकमध्ये गुटखा व सुगंधीत तंबाखू असल्याचे आढळून आले. ट्रक पोलिस स्टेशनमध्ये आणून पुणे येथील अन्न सुरुक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांच्या उपस्थितीत पाहणी केली. या कारवाईत पोलिसांनी लाखोचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई भोर उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे आणि पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वैभव सोनवणे, पोलिस हवालदार लियाकत मुजावर, जब्बार सय्यद, सुरज नांगरे, पोलिस नाईक गणेश पोटे, पोलिस हवालदार नवनाथ नानवर, वैभव मदने यांच्या पथकाने केली. दरम्यान संशयितांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी करीत आहेत.