सोन्याच्या नावाखाली चांदीचे दागिने तारण; पतसंस्थेला 9.41 लाखांचा गंडा
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, श्री आंबिका ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या महाळुंगे पडवळ शाखेत ८ जून २०२६ रोजी सचिन राधाकिसन मोरे (रा. नांदूर, ता. आंबेगाव) यांनी खाते उघडून पतसंस्थेचे सभासदत्व स्वीकारले. त्याच दिवशी त्यांनी ३८ ग्रॅम ६०० मिली वजनाचे दागिने सोने तारण कर्जासाठी ठेवले. पतसंस्थेचे सोने मूल्यांकन करणारे कर्मचारी किरण सूर्यकांत दहीवाळ यांनी केलेल्या मूल्यांकनानुसार व्यवस्थापक योगेश गावडे यांनी ३ लाख १४ हजार ५०० रुपयांचे कर्ज मंजूर करून ही रक्कम मोरे यांच्या बचत खात्यात जमा केली. त्यानंतर १६ जून २०२६ रोजी मोरे यांनी पुन्हा ७६ ग्रॅम ९०० मिली वजनाचे दागिने तारण ठेवून ६ लाख २७ हजार रुपयांचे कर्ज घेतले. अशाप्रकारे दोन व्यवहारांत एकूण ९ लाख ४१ हजार ५०० रुपयांचे कर्ज उचलले.
दरम्यान, काही दिवसांनी तारण ठेवलेल्या दागिन्यांबाबत मूल्यांकन करणारे कर्मचारी दहीवाळ यांनी शंका उपस्थित केली. त्यानंतर पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांनी दागिन्यांचे पुन्हा मूल्यांकन केले असता, त्यामध्ये केवळ २२.५७ टक्के सोने आणि ७७.२६ टक्के चांदी असल्याचे आढळून आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
याशिवाय, मोरे यांनी दिलेल्या पत्त्यावर चौकशी केली असता नांदूर येथे या नावाची व्यक्ती राहत नसल्याचे समोर आले. तसेच कर्जासाठी सादर केलेली कागदपत्रेही खोटी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोन्याच्या नावाखाली चांदीचे दागिने तारण ठेवून खोटी कागदपत्रे सादर करत पतसंस्थेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गायकर यांनी तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मंचर पोलिस करत आहेत.
१. पतसंस्थेची फसवणूक किती रकमेची झाली?
श्री आंबिका ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची एकूण ९ लाख ४१ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.
२. फसवणूक कशी करण्यात आली?
सोन्याचे दागिने असल्याचे भासवून प्रत्यक्षात चांदीचे दागिने तारण ठेवून कर्ज घेण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
३. आरोपीने किती वेळा कर्ज घेतले?
सचिन राधाकिसन मोरे यांनी दोन वेळा दागिने तारण ठेवून कर्ज घेतले.






