बारावीत शिकणाऱ्या तरुणीची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन, कारण...फोटो सौजन्य - X)
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडत आहेत. असे असताना नागपुरात एका महाविद्यालयीन तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
प्रांजली दिलीप ननकटे (वय १८, रा. सिरसी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. सिरसी येथील रहिवासी तथा उमरेडमधील कनिष्ठ महाविद्यालयात बारावीत शिकणाऱ्या प्रांजली हिने रुममध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना शनिवारी (दि.३०) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. तरुणीच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.
प्रांजली उमरेड येथील धनगर मोहल्ल्यात पडवे यांच्या घरी भाड्याने राहत होती. तिच्यासोबत तिचे दोन भाऊ एक दहावी आणि दुसरा आठवीत शिक्षण घेत होते. काही दिवसांपूर्वी ती आपल्या मूळ गावी सिरसी येथे गेली होती. शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ती पुन्हा उमरेड येथे आपल्या खोलीवर परतली. त्यावेळी तिचे दोन्ही भाऊ गणपती सणानिमित्त मोठ्या आईकडे मुक्कामी गेले होते. सायंकाळी घरी परतलेल्या भावांनी खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे पाहिले. त्यांनी बरेच आवाज दिले. परंतु, प्रतिसाद न मिळाल्याने लहान भावाने मागच्या बाजूच्या खिडकीतून डोकावून पाहिले असता, प्रांजली पंख्याला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.
दरम्यान, या घटनेची माहिती शेजाऱ्यांना देऊन दरवाज्याची कडी तोडण्यात आली. तत्काळ उमरेड पोलिस स्टेशनला कळवण्यात आले. पोलिस अधिकारी भगवान यादव आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह खाली उतरवला. प्रांजलीच्या आई-वडिलांना तातडीने संपर्क करून उमरेड येथे बोलावण्यात आले. मृतदेह उमरेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
प्रांजली तणावात असल्याचा अंदाज
पोलीसांच्या प्राथमिक तपासानुसार, प्रांजली ही मानसिक तणावाखाली (डिप्रेशन) असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. उमरेड पोलिस आत्महत्येमागील कारणाचा शोध घेत आहे.