File Photo : Bribe
आग्रा : अनेकदा सरकारी किंवा काही खाजगी कामासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना लाच दिल्याचे ऐकले असलेच. पण पासपोर्टच्या कामासाठी लाच स्वीकारणे पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना (Bribe Case) चांगलंच महागात पडलं आहे. पोलिस आयुक्तालयात 7 उपनिरीक्षकांसह 30 पोलिसांना निलंबित करण्यात आले. यातील 16 पोलिसांवर पासपोर्ट अहवाल दाखल करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप आहे.
आग्राचे पोलिस आयुक्त जे. रविंदर गौड यांनी निवडणुकीपूर्वी बीट पोलिस अधिकारी (बीपीओ) प्रणाली लागू केली होती. पासपोर्ट अहवाल आणि चारित्र्य प्रमाणपत्राच्या बदल्यात लाच न घेण्याच्या सूचना बीपीओला होत्या. बीपीओ आणि इन्स्पेक्टरचे कामकाज जाणून घेण्यासाठी फीडबॅक सेल तयार करण्यात आला. त्यानुसारच, पासपोर्टसाठी लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांमध्ये सायबर सेलमधील पाच पोलिसांचा समावेश आहे. त्यांच्यात गटबाजीचा आरोप होता.
या ठिकाणी तैनात असलेले पोलिस अर्जदार आणि पीडितांना फोन करून त्यांचा अभिप्राय घेतील. दरम्यान, पोलिस आयुक्तालयाच्या फीडबॅक सेलने या पोलिसांची ओळख पटवली होती. त्यानंतर झालेल्या या निलंबनाच्या कारवाईमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.