फोटो सौजन्य- gemini
कॅम्प क्रमांक ४ मधील सुभाष टेकडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून दोन ते तीन दिवसांआड नळाला पाणी येत असून, तेही अत्यंत गढूळ आणि दुर्गधीयुक्त असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पाण्याचा वापर केल्यामुळे काही नागरिकांना खोकला, उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत होऊ लागला आहे.
सुभाष टेकडी परिसरातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, महानगरपालिकेने बसविलेल्या बोअरवेलची दुरवस्था झाली असून, नियमित पाणीपुरवठाही होत नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दोन-तीन दिवसांनंतर नळाला पाणी आल्यास ते साठवून ठेवण्याशिवाय नागरिकांकडे पर्याय राहत नाही. मात्र, नळाद्वारे येणारे पाणी गढूळ रंगाचे असून त्यातून प्रचंड दुर्गंधी येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे हे पाणी उकळून घेतल्यानंतरही त्याची दुर्गंधी जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. अशा पाण्याचा वापर करण्याची वेळ नागरिकांवर आल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही नागरिकांना उलट्या, जुलाब, घशाचा त्रास आणि खोकल्याच्या तक्रारी जाणवत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सुभाष टेकडी परिसरातील रहिवाशामध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे.
यासंदर्भात समाजसेवक संजय वाघमारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
ते म्हणाले की, सुभाष टेकडी परिसरात येणारे गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी पिण्यासाठी तर सोडाच, घरगुती वापरासाठीदेखील योग्य नाही.
या पाण्याला सडलेल्या माशाप्रमाणे भयंकर दुर्गंधी येत आहे.
नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी उपलब्ध करून देणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे.
महानगरपालिकेने सुभाष टेकडी परिसरातील पाणीपुरवठ्याची तातडीने तपासणी करून पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महापालिकेने तातडीने पाणीप्रश्न सोडवला नाही, तर सुभाष टेकडी परिसरातील नागरिकांना एकत्र करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संजय वाघमारे यांनी दिला आहे.
यासंदर्भात पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुले यांच्याशी संपर्क साधला असता, काही तांत्रिक बाबींमुळे दूषित पाणी येत असून एमआयडीसीला पत्रव्यवहार करण्यात आल्याचे सांगितले.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: उल्हासनगर कॅम्प क्रमांक ४ मधील सुभाष टेकडी परिसरात दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे.
Ans: काही नागरिकांना उलट्या, जुलाब, खोकला आणि घशाचा त्रास होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
Ans: पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुले यांनी काही तांत्रिक कारणांमुळे दूषित पाणी येत असल्याचे सांगितले. यासंदर्भात एमआयडीसीला पत्रव्यवहार केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.






