टेंभुर्णी रोडवर भीषण अपघात : तीन युवकांचा मृत्यू, दोन जखमी
टेंभुर्णी, माढा : अकलूज-टेंभुर्णी रस्त्यावर मस्के वस्तीजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक होती. हा अपघात रविवार, ८ जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये ओंकार बाबासाहेब शिंदे (वय १८, रा. करकंब, ता. पंढरपूर), प्रशांत कुंडलिक खडतरे (वय २२, रा. अकलूज, ता. माळशिरस) आणि निखिल अनिल वंजारे (वय २०, रा. करकंब, ता. पंढरपूर) यांचा समावेश आहे. सुरज अरुण लोखंडे (वय १८, रा. उपरी, ता. पंढरपूर), दयानंद उर्फ बंटी जाधव (वय २२, रा. अकलूज), आणि प्रशांत खडतरे हे तिघे एमएच ४५ एडब्ल्यू २६४९ या क्रमांकाच्या दुचाकीवरून अकलूजच्या दिशेने जात होते.
दरम्यान, टेंभुर्णीपासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या मस्के वस्तीजवळ समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकी (क्रमांक एमएच १३ ईआर २९०६) वर ओंकार शिंदे व निखिल वंजारे हे दोघे येत होते. दोन्ही दुचाकींमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. यात प्रशांत खडतरे याचा जागीच मृत्यू झाला. ओंकार शिंदे याला उपचारासाठी टेंभुर्णी येथे नेण्यात आले, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. निखिल वंजारे याच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्याला तातडीने सोलापूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या अपघातात सुरज लोखंडे आणि दयानंद जाधव हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. रात्री उशिरा पर्यंत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या प्रशांत कुंडलिक खडतरे यांचा आजच वाढदिवस होता. विशेष म्हणजे त्यांच्या भावाचे लग्न ठरल्याने ते पत्रिका वाटपासाठी सोलापूरला गेले होते. काम आटोपून ते घरी परतत असताना वाटेतच अपघात घडला आणि त्यांच्या वाढदिवसाच्याच दिवशी मृत्यूने त्यांना गाठले. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.