धावत्या लोकलमधून 8 ते 12 प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ पडले; 6 जणांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी (फोटो सौजन्य-X)
Mumbai Local News Marathi: दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून गाडीतून 8 ते 12 प्रवासी पडल्याची माहिती समोर आली आहे. फास्ट लोकलमध्ये असलेल्या गर्दीमुळे हे प्रवासी खाली पडल्याची माहिती असून यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच इतर जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे माहिती मिळत आहे. ही घटना आज (9 जून) सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
जखमी प्रवाशांना तातडीने कळव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेत प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. त्यामुळे अनेक प्रवासी दारातच उभे होते. त्यातच दिवा ते कोपर या स्थानकादरम्यान काही प्रवासी चालत्या ट्रेनमधून खाली पडले. जखमी आणि मृत प्रवशांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे, तसेच, हे प्रवासी ३० -३५ वयोगटातील असल्याची माहिती आहे.
IND vs ENG : इंग्लंड लायन्सला भारताने 327 धावांवर रोखलं! खलील अहमदने केली कमाल
या अपघाताचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडीओत लोकलमधून काही प्रवासी खाली पडलेले दिसत आहेत. अपघातानंतर जखमी प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर नेण्यात आले. या प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचेही सांगण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांतील हा सर्वात मोठा अपघात असल्याचेही बोलले आहे. पण रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंब्रा स्थानकाजवळ पाच प्रवासी रेल्वेतून खाली पडल्याची घटना घडली आहे. कसाऱ्याकडे जाणाऱ्या एका रेल्वेच्या गार्डने याबाबत माहिती दिली. हे प्रवासी नेमकी कोणत्या गाडीतून खाली पडले, याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. या घटनेची चौकशी सुरू असून, रेल्वे प्रशासन पुढील तपास करत आहे.
दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान पडलेल्या पाचही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. पण हे प्रवासी खाली कसे पडले, हे अद्याप समजू शकले नाही. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. घटनेची चौकशी सुरू असून, प्रवासी नेमके कशा कारणामुळे खाली पडले याचा तपास सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.