पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; उद्योजक दाम्पत्याचा मृत्यू, कारमधील एअरबॅग उघडूनही... (Photo Credit- X)
कोल्हापूर : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात कोल्हापूर शहरातील तरुण उद्योजक दाम्पत्याचा मृत्यू झाला. तर सुदैवाने या अपघातात त्यांची 8 महिन्यांची मुलगी वाचली आहे. ही घटना कोगनोळी चेकपोस्ट नाक्याजवळ प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर घडली.
जिगर किशोर नाकराने (वय २४) आणि त्यांची पत्नी ऋतिका (वय २४) अशी मृतकांची नावे आहे. या अपघात सुदैवाने त्यांची ८ महिन्यांची मुलगी बचावली. जिगर आणि ऋतिका यांच्या मृत्युळे नाकराने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघाताची माहिती मिळताच कोल्हापूर परिसरात शोककळा पसरली आहे. जिगर आणि ऋतिका हे मूळचे कच्छ (गुजरात) येथील असले तरी गेल्या काही वर्षांपासून ते कोल्हापूरमध्ये स्थायिक झाले होते. जिगर हे प्लायवूड, लाकडी दरवाजे आणि संबंधित साहित्य निर्मितीचा व्यवसाय करत होते.
कागल येथील फाईव्ह स्टार एमआयडीसीमध्ये त्यांचा उद्योग सुरू होता. हे दाम्पत्य शुक्रवारी सकाळी मुलगी वृष्टीसह कारने हुबळी येथे गेले होते. तेथे सामुदायिक विवाह सोहळा आटोपून दुपारी सुमारे चारच्या सुमारास ते कोल्हापूरकडे परत निघाले. कोगनोळी चेकपोस्ट नाक्याजवळ प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर पावतीसाठी थांबलेल्या कंटेनरला त्यांच्या कारने मागून जोरदार धडक दिली. कार वेगात असल्यामुळे तिचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.
कारमधील एअरबॅग उघडूनही गंभीर जखमी
अपघातानंतर कारमधील एअरबॅग उघडल्या. पुढील सीटवर बसलेले जिगर आणि ऋतिका गंभीर जखमी झाले. मात्र, मागील सीटवर पाळण्यात झोपलेली लहानगी वृष्टी सुरक्षित राहिली. तिला किरकोळ दुखापतीच झाल्या.
दोघांचाही उपचारादरम्यान झाला मृत्यू
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना रात्री साडेआठच्या सुमारास ऋतिकाचा मृत्यू झाला, तर मध्यरात्री जिगर यांचा मृत्यू झाला. त्यांची लहान मुलगी वृष्टीवर उपचार सुरू आहेत.
मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू
दुसऱ्या एका घटनेत, मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका ६५ वर्षीय महिलेला भरधाव कारने धडक दिल्याचे समोर आले आहे. या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार पहाटे 5.30 ते 6.00 वाजताच्या दरम्यान झाला. अपघातात मृत पावलेल्या महिलेचं नाव आशा पाटील (वय 65) असे होते.
हेदेखील वाचा : Pune Accident: पुण्यात हिट अँड रनचा कहर; मॉर्निंग वॉकला निघालेल्या 65 वर्षीय महिलेचा भरधाव कारने चिरडून मृत्यू






