संग्रहित फोटो
तक्रारदार डॉक्टर महिलेचे रुग्णालय विश्रांतवाडीतील धानोरीत आहे. संबंधित रुग्णालयात अनियमितता असल्याबाबतचा तक्रार अर्ज पुणे महापालिकेच्या नगर रस्त्यावरील क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. चकोर यांच्याकडे पाठविला होता. संबंधित तक्रार अर्जाची चौकशी डॉ. चकोर यांच्याकडे सोपविली होती. त्यानुसार १८ सप्टेंबर रोजी डॉ. चकोर हे संबंधित रुग्णालयात चौकशीसाठी आले.
‘संबंधित रुग्णालयाची चौकशी करुन अहवाल वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठवावा लागेल. त्रूटी आढळून आल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होईल. कारवाई न करण्यासाठी २० लाख रुपयांची लाच द्यावी लागेल’, असे डॉ. चकोर यांनी तक्रारदार डॉक्टर महिलेला सांगितले. त्यानंतर डॉ. चकोर यांनी तक्रारदार डॉक्टर महिलेकडून १५ हजार रुपयांची लाच घेतली. नंतर महिला डॉक्टरला ३० हजार रुपये घेऊन नगर रस्त्यावरील क्षेत्रीय कार्यालयात शनिवारी (२६ सप्टेंबर) बोलाविले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने डॉ. चकोर यांच्या दालनाच्या परिसरात सापळा लावून ३० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या डॉ. चकोर यांना पकडले.
डॉ. चकोर यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नीता मिसाळ यांनी ही कारवाई केली आहे.






