संग्रहित फोटो
पुणे : सिंहगड किल्यावरील झुंझार बुरुजाजवळ एका ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. येथे भटकंतीस आलेल्या पर्यटकांना रविवारी सकाळी डोंगर उतारावर हा मृतदेह दिसला. त्यांनी तत्काळ पोलिसांना संपर्क साधला. दुपारपर्यंत मृतदेहाला दरीतून वर आणण्यास यश आले असले तरी संबंधित व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झुंझार बुरुजाजवळ पुरातत्व विभागाच्या नियंत्रणाखाली आहे. दरम्यान, रविवारी इंद्राणी बालन फाउंडेशनचे सुरक्षारक्षक श्रीकांत लांघी आणि हर्षद गायकवाड सकाळी दैनंदिन साफसफाई करत होते. तेव्हा काही पर्यटक बुरुजाजवळ फिरताना दिसले. कर्मचाऱ्यांनी त्यांना बुरुजाजवळ मधमाशांचे पोळे असल्याने फिरण्यास विरोध केला. तेव्हा या कर्मचाऱ्यांना दरीत व्यक्ती पडलेली असल्याचे सांगण्यात आले. पोलीस व आपत्ती व्यवस्थापन समिती तसेच वनपाल आणि वनव्यवस्थापन समितीशी संपर्क साधला.
राजगड पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाचे पथकाने धाव घेतली. खोल दरीत पडलेला मृतदेह काढण्यासाठी लांघी, गायकवाड यांच्यासह स्वप्नील सांबरे, दीपक जोरकर, दत्ता जोरकर, सुमित रांजणे, राहुल जोरकर, वन व्यवस्थापन समितीचे सुरक्षारक्षक नंदू जोरकर, अमोल पढेर यांनी मदत केली.
मृत व्यक्ती अंदाजे ६० वर्षांची असून, पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली नव्हती. प्राथमिक तपासणी करताना त्यांच्या शर्टमध्ये शनिवारी काढलेले स्वारगेट ते डोणजे असे बसचे तिकीट मिळाले आहे. मात्र, व्यक्तीचे नाव, पत्ता अशी माहिती अद्याप मिळालेली नाही. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्याकडून पुढील तपास सुरू आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्यात घडली विचित्र घटना; ‘हा’ स्वादिष्ट पदार्थ वेळेत न दिल्याने निर्माण झाला वाद; हॉटेल मालकाने थेट ग्राहकालाच….
गडावर जाताना काळजी घ्या
दरम्यान गेल्या काही महिन्याखाली पुण्यात सिंहगडावर जवळपास 50 पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. सिंहगडावरील तोफेच्या पॉईंट परिसरात अनेक पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. हल्ल्यात अनेक तरुण-तरुणी गंभीर जखमी झाले होते. या घटनेमुळे पर्यटकांमध्ये दहशत पसरली आहे. त्यामुळे पर्यटक पर्यटनासाठी सावधानगिरी बाळगत जात आहेत. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. अशातच मधमाशांनी हल्ला केल्यानं पर्यटकांची मोठी धावपळ उडाली होती. गडावर मधमाशांच्या हल्ल्याच प्रमाण वाढल्यानं, गडावर येणाऱ्या पर्यटकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.






