संग्रहित फोटो
पुणे : वर्षभरापूर्वी पुण्यात झालेल्या वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीने आयुष कोमकरला संपवले. 5 सप्टेंबरला गणेश विसर्जनाच्या आदल्या रात्री आठ वाजता पुण्यातील नाना पेठ परिसरात दोन मारेकऱ्यांनी आयुष कोमकर याच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी काही दिवसाखाली आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. आता कोमकर हत्या प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे. अटकेत असलेल्या आंदेकर टोळीतील सदस्यांची सोमवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा आदेश दिला आहे.
आंदेकर टोळीचा प्रमुख सूर्यकांत बंडू अण्णा आंदेकर (वय ७०), तुषार नीलंजय वाडेकर (वय २७), स्वराज नीलंजय वाडेकर (वय २३), अमन युसूफ पठाण (वय २५, सर्व रा. नाना पेठ), सुजल राहुल मेरगु (वय २०), यश सिद्धेश्वर पाटील (वय १९), अमित प्रकाश पाटोळे (वय १९), शिवम ऊर्फ शुभम उदयकांत आंदेकर (वय ३१), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय २१), शिवराज उदयकांत आंदेकर (वय २९), कृष्णा ऊर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर(वय ३६), मुनाफ रिजाय पठाण (वय २८, रा. नाना पेठ) यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. तर यापूर्वीच लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०, सर्व रा. नानापेठ) आणि वृंदावनी नीलंजय वाडेकर (वय ४०) यांना येरवडा कारागृहात पाठविण्यात आले आहे.
बंडू आंदेकर तसेच सोमनाथ गायकवाड यांच्या टोळी युद्धातून वनराज आंदेकर याचा गेल्या वर्षी गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून खून झाला होता. या खूनाचा बदला म्हणून गणेश कोमकरचा मुलगा आयुषचा गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गोळ्या झाडून खून करण्यात आला होता, असे पोलिस तपासातून पुढे आले आहे.
गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. तर आरोपी पोलिस कोठडीत असताना झालेल्या तपासाची माहिती तपास अधिकारी असलेले सहायक आयुक्त शंकर खटके यांनी दिली. आरोपींच्या वतीने ॲड. मिथुन चव्हाण, ॲड. मनोज माने, ॲड. प्रशांत पवार, ॲड. प्रतीक पवार आणि ॲड. अमित थोरात यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.