संग्रहित फोटो
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
नांगरगाव परिसरातील एका बंगल्यात काही व्यक्ती एकत्र येऊन बेकायदा कॉल सेंटर चालवत असल्याची माहिती लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश विधाते यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर तपासाला वेग आला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा शहर पोलिसांच्या पथकाने संबंधित बंगल्यावर छापा टाकला.
पोलिसांनी पंचांसमक्ष बंगल्यात प्रवेश केला असता, काही व्यक्ती हेडफोन लावून लॅपटॉप आणि मोबाईलच्या साहाय्याने इंग्रजीत संभाषण व चॅटिंग करताना आढळल्या. लगतच्या खोलीतही अशाच प्रकारचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तींकडे कॉल सेंटर चालविण्यासाठी आवश्यक अधिकृत परवानगीची समाधानकारक कागदपत्रे आढळून आली नाहीत.
अमेरिका, कॅनडातील नागरिकांना लक्ष्य
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी इंटरनेट कॉलच्या माध्यमातून अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांतील नागरिकांशी संपर्क साधत होते. अॅमेझॉन, गुगल यांसारख्या नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून विविध योजनांचे आमिष दाखविले जात होते.
नागरिकांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यांची माहिती, क्रेडिट कार्ड आणि एटीएम कार्डसंबंधी तपशील मिळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे तपासात समोर आले आहे. या माहितीचा वापर करून बनावट बँकसंबंधित कागदपत्रे तयार केली जात असल्याचाही संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पार्सलच्या नावाखाली भीती दाखवून फसवणूक
काही नागरिकांना त्यांच्या नावाने मागविलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडल्याचे सांगून भीती दाखविली जात होती. अशा प्रकारे नागरिकांना मानसिक दबावाखाली आणून त्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील संपूर्ण आर्थिक व्यवहार आणि फसवणुकीची पद्धत उघड करण्यासाठी पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईल फोन व लॅपटॉपची तपासणी सुरू केली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास
या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि इंडियन टेलिग्राफ कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, ते पोलीस कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश विधाते तसेच दोन्ही पथकांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.
Ans: मावळ तालुक्यातील नांगरगाव येथील ओमेगा सोसायटीमधील ‘देव व्हिला’ बंगल्यावर छापा टाकून पोलिसांनी बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला.
Ans: पुणे ग्रामीण पोलिसांनी या कारवाईत २० जणांना अटक केली आहे.
Ans: पोलिसांनी मोबाईल फोन, लॅपटॉप, रोख रक्कम आणि चारचाकी वाहनांसह एकूण ३६ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.






