
पुणे : पुणे शहरात बेकायदेशीररित्या विक्रीसाठी आणण्यात आलेला मोठा शस्त्रसाठा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने पकडला आहे. धायरी परिसरातील नऱ्हे येथून हा शस्त्रसाठा एका तरुणाकडून जप्त करण्यात आला आहे. पुणे शहरात गुन्हेगारीसाठी हा शस्त्रसाठा वापरला जाण्याची शक्यता देखील होती. त्यामुळे मोठा कट गुन्हे शाखेने उधळून लावला आहे. भूषण उत्तम मोहिते (वय २३, रा. धायरी पोकळे वस्ती) असे अटक करण्यात आलेल्यांचे नावे आहे.
त्याच्याकडून चार गावठी पिस्तुले, तीन जिवंत काडतुसे असा सुमारे २ लाख ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक महेश सागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पुणे शहरात बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या, फरार व तडीपार गुन्हेगारांविरोधात कारवाई करण्याच्या वरिष्ठांनी आदेश दिले आहेत. गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथक एक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार सचिन माळवे, सोमनाथ कांबळे व दयानंद तेलंगे यांच्या यांना नऱ्हे परिसरातील गोखुळनगरमध्ये एक व्यक्ती विक्रीसाठी तीन ते चार पिस्तुले घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी संशयित भूषण मोहिते याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून चार गावठी पिस्तुले व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
प्राथमिक चौकशीत पिस्तुले गुजरातवाडी परिसरातील महेश कांबळे याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची माहिती आरोपीने दिली. याप्रकरणी नऱ्हे पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियमासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या अवैध शस्त्रांच्या पुरवठ्यामागील रॅकेटचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.