संग्रहित फोटो
सांगली : राज्यात फसवणुकींच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना दररोज उघडकीस येत असतात. अशातचं आता सांगलीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. पवनचक्की विक्रीच्या व्यवहारात सांगलीतील एका व्यावसायिकाची 45 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी घाटकोपर मुंबई येथील दाम्पत्यावर विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
दत्तात्रय मुसळे आणि वैशाली दत्तात्रय मुसळे (दोघेही रा. राजश्री प्लाझा सिनेमा टॉकीजनजीक, एलबीएस मार्ग, घाटकोपर, मुंबई) अशी संशयितांची नावे आहेत. मार्च २०१६ ते सप्टेंबर २०१६ यादरम्यान ही घटना घडली आहे. याबाबत शरद ज्ञानोबा खराडे (रा. योग बंगला, नागराज कॉलनी, विश्रामबाग, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादी खराडे स्थापत्य अभियंता आहेत. संशयित मुसळे दाम्पत्याने त्यांच्याशी संपर्क साधला. संशयितांनी सातारा जिल्ह्यातील वरुड (ता. खटाव) येथे गट क्रमांक ६९२ आणि औंध येथे गट क्रमांक २१ या दोन ठिकाणी विनकॉन कंपनीच्या दोन पवनचक्क्या मालकीच्या असल्याचे सांगितले. या दोन्ही पवनचक्क्या विकायच्या असून त्यासाठी ५१ लाख रुपये रक्कम निश्चित केली. या पवनचक्क्या हस्तांतरणाबाबत वाद असल्याची माहिती त्यांनी खराडे यांच्यापासून लपवून ठेवली. याबाबत काही माहिती नसल्याने खराडे यांनी संशयित दाम्पत्यास ४५ लाख रुपये दिले. आता फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खराडे यांनी विश्रामबाग पोलिसांत धाव घेतली.