संग्रहित फोटो
इस्लामपूर : राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. दररोज चोरटे वेगवेगळे आमिष दाखवून नागरिकांच्या पैशावर डल्ला मारत आहेत. फसवणुकीच्या घटनांना बळी नपडण्याचे आवाहन वेळोवेळी पोलिसांकडून केले जात आहे मात्र फसवणुकीच्या घटना थांबताना दिसून येत नाही. अशातच आता इस्लामपुरमधून एक मोठी घटना समोर आली आहे. मासेमारी व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने इस्लामपूर येथील महिलेची तब्बल ३५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी दापोली तालुक्यातील दांपत्याविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुक्ताई दत्ताराम चोगले, दत्ताराम नामदेव चोगले (रा. पाजपंढरी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत आशाराणी शिवाजी पाटील (वय ४९, रा. इस्लामपूर) यांनी फिर्याद दिली आहे. २३ नोव्हेंबर २०२३ ते २९ एप्रिल २०२४ दरम्यान हा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, दोन वर्षापूर्वी आशाराणी व त्यांचे पती शिवाजी दापोली तालुक्यातील हर्णे बंदर येथे फिरायला गेले होते. तेथे त्यांची ओळख मुक्ताई व दत्ताराम यांच्याशी झाली. या ओळखीतून त्यांचे कौटुंबिक आणि विश्वासाचे संबंध निर्माण झाले. चोगले दांपत्याने आपला मासेमारीचा व्यवसाय असून, बोटीचा परवानाही असल्याचे पाटील यांना सांगितले. तुम्ही या व्यवसायात पैसे गुंतवल्यास तुम्हाला चांगला आर्थिक फायदा मिळेल, असे आमिष दाखवले. बोटीसाठी ३५ लाख रुपये लागतील, असे सांगून त्या बदल्यात दोन वर्षांपर्यंत दर महिन्याला २ लाख रुपये देण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
इस्लामपूर येथून आशाराणी यांनी नोव्हेंबर, डिसेंबर २०२३ या महिन्यात बोटीच्या जाळ्यासाठी १५ लाख रुपये चोगले दांपत्याला दिले. त्यानंतर पतसंस्थेचे कर्ज काढून आणखी २० लाख रुपये दिले. एप्रिल २०२४ मध्ये दोघांच्या व्यवहाराचे करारपत्र करण्यात आले. त्या करारानुसार, चोगले यांनी महिन्याला २ लाख रुपये देण्याचे लेखी मान्य केले होते. काही दिवसांनी चोगले यांनी आशाराणी यांचे फोन घेणे बंद केले. संशय आल्याने आशाराणी व त्यांचे पती हर्णे बंदर येथे गेले. तेथे चौकशी केली असता चाैगले दांपत्य निघून गेल्याचे समजले.
खोटी कागदपत्रे दाखवून दिशाभूल
चोगले याने बोट चालवण्याचा परवाना व १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील करारपत्राचा फोटो पाटील यांच्या मोबाईलवर पाठवला. बोटीचा परवाना मिळाला आहे, व्यवसाय सुरू करायचा आहे, ठरल्याप्रमाणे पैसे देऊ, असे संशयित सांगत होते. आशाराणी हर्णे बंदर येथे गेल्यानंतर चोगले दांपत्याने खोटी कागदपत्रे पाठवल्याचे समोर आले. चोगले यांनी आणखी दोघांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.