संग्रहित फोटो
पुणे : कोथरूड भागात कुख्यात गुंड घायवळ गँगच्या टोळीकडून झालेल्या गोळीबारानंतर आता स्वारगेट भागात दुधानी गँगने दहशत माजवली आहे. मोक्का रिर्टन आणि सराईतांनी दहशत माजवून एकावर कोयत्याने वार केले आहेत. कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्नही केला आहे. नंतर परिसरात हवेत हत्यारे फिरवून दहशत माजवत गोंधळ घातला. शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास डायसप्लॉट येथे ही घटना घडली. त्यामुळे शहरातील गुन्हेगारांची दहशत कायम असल्याचेही दिसत आहे.
याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात भक्तीसिंग दुधानी, शक्तीसिंग दुधानी, गोविंदसिंग टाक, आकाशसिंग दुधानी याच्यासह सात जणांविरोधात भारतीय न्याय संहिता १०९, १८९, १८९(२), १९१(२), १९१(३), आर्म ४ (२५), मपोका ३७, (३) सह १३५, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आबा सरोदे (वय ३९) यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गोविंदसिंग टाक याच्यावर मोक्का कारवाई झालेली आहे. तो एप्रिल २०२५ मध्ये कारागृहातून बाहेर आला आहे. तर, दुधानी यांच्यावर देखील खूनाचा प्रयत्न, आर्म अॅक्ट सारखे गुन्हे दाखल आहेत. आरोपी याच भागात राहण्यास आहेत. तक्रारदार व त्यांची केवळ तोंड ओळख आहे. परंतु, त्यांनी जुन्या वाद व रागातून त्यांच्यावर हल्ला केला असल्याचे सांगण्यात आले.
हे सुद्धा वाचा : आंदेकर टोळीची दहशत? तपासातून धक्कादायक माहिती उघड; गेल्या 12 वर्षात तब्बल…
दहशतीचे वातावरण
तक्रारदार शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास डायसप्लॉटच्या कॅनॉललगत थांबलेले होते. तेव्हा आरोपींनी त्यांना गाठले. त्यांना प्रथम हाताने मारहाण केली. नंतर त्यांच्यावर टोळक्याने कोयत्याने हल्ला करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्यानंतर टोळक्याने परिसरात दहशत देखील माजवली. हवेत हत्यारे फिरवून ही दहशत माजविल्याने या भागात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दहशतीनंतर टोळके पसार झाले. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक निकीता पवार या करत आहेत.
घायवळ टोळीही चर्चेत
बुधवारी मध्यरात्री कुख्यात निलेश घायवळ टोळीने पुण्यात धुमाकूळ घालत सलग दोन गंभीर गुन्हे केले. कोथरूडमधील मुठेश्वर परिसरात प्रथम ३६ वर्षीय प्रकाश धुमाळ यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर काही अंतरावरच सागर साठे या तरुणावर कोयत्याने वार करून हल्ला करण्यात आला. एका रात्री दोन रक्तरंजित कृत्यांमुळे पुन्हा एकदा घायवळ टोळी चर्चेत आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी टोळीतील मयूर कुंभार, मुसा शेख, रोहित अखाड, गणेश राऊत यांच्यासह आणखी एका साथीदाराला अटक केली आहे.