संभाजीनगरात मध्यरात्री गोळीबाराचा थरार; कारचा टायर फुटला, दोन तरुण... (संग्रहित फोटो)
छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा परिसरात मध्यरात्री एका स्कूटीवर आलेल्या तिघांनी कारवर गोळीबार केला. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि.22) मध्यरात्री 12.35 च्या सुमारास घडली. या गोळीबारात कारचा टायर फुटला असून, यात दोन तरुण थोडक्यात बचावले आहेत. याप्रकरणात तौफिक शेफिक पठाण (वय ३०, रा. कमळापूर, वाळूज) यांनी फिर्याद दिली. पोलिस आता याप्रकरणाचा तपास करत आहेत.
फिर्यादी तौफिक हे त्यांचा मित्र निसार जबार खान (रा. वैशाली ढाब्याजवळ, मिसारवाडी) याच्यासह रविवारी रात्री चिकलठाणा परिसरातील हॉटेलात जेवणासाठी गेले होते. रात्री 12 वाजून 16 मिनिटांनी बिल देऊन ते बाहेर पडले असता गणेश औताडे नावाचा दारूच्या नशेत असलेला व्यक्ती हॉटेलबाहेर आला व त्यांच्या गाडीजवळ लघुशंका करू लागला. यावरून त्याचा वाद झाला. त्याच्या सोबतीच्या व्यक्तीने माफी मागितल्याने तो प्रकार तेथेच मिटला. यानंतर पठाण व खान हे दोघे आपल्या स्वतंत्र गाड्यांमधून रात्री साडेबारा वाजता कलाग्राममहर्गे प्रोझोनकडून कमळापूरकडे निघाले.
हेदेखील वाचा : Pune Crime: रस्ता न दिल्याच्या वादातून कुख्यात घायवळ टोळीचा गोळीबार; तीन राउंड फायर, गंभीर जखमी
दरम्यान, सनप्रभा फोर्ड सर्व्हिस सेंटरसमोर निसार खान यांनी लघुशंका करण्यासाठी गाडी थांबवली. पठाण यांनी त्यांची कार शेजारी उभी केली होती. तेवढ्यात रात्री १२.३५ च्या सुमारास एपीआय कॉर्नरकडून पांढऱ्या रंगाच्या स्कूटीवरुन तिघे जण आले. स्कूटीवर बसलेल्या काळ्या टी-शर्ट घातलेल्या व्यक्तीने स्कूटी थांबवण्यास सांगितले. पळत येऊन त्याने बंदूक बाहेर काढली. त्याने थेट पठाण यांच्या गाडीच्या दिशेने गोळी झाडली.
गोळी थोडक्यात चुकवून निसारखान बचावले
पठाण यांच्या गाडीच्या दिशेने गोळी झाडली. त्यात निसार खान यांच्या डाव्या कानाजवळून गोळी गेली व कारच्या काचेला लागली. त्यामुळे काचेला छिद्र पडून ती फुटली, या घटनेमुळे घाबरलेले पठाण खान यांनी जीव वाचवण्याच्या नादात गाडीचा वेग वाढवून एपीआय कॉर्नर मारी बेट एमआयडीसी सिडको पोलिस ठाणे गाठले.
हेदेखील वाचा : Satara crime: साताऱ्यात भरदिवसा गोळीबार! जुन्या खुनाचा घेतला बदला; दुचाकीवरून आले आणि झाडल्या गोळ्या