संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहरात गेल्या दोन दिवसात घरफोडीच्या सहा घटना घडल्या असून, यामध्ये चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून लाखो रुपयांवर डल्ला मारला आहे. कोंढव्यात सलग घरफोडीच्या घटना घडल्या असून, चोरट्यांनी एका रात्रीत एकाच सोसायटीतील दोन फ्लॅट तर स्वारगेटला एक फ्लॅट फोडला आहे. तसेच, विमानतळ, हडपसरमध्येही फ्लॅट फोडले आहेत.
कोंढवा पोलिसांत ४७ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार कोंढव्यातील खडी मशीन चौकातील उत्सव हाऊसिंग सोसायटीत राहतात. त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५२ हजारांची रोकड, तसेच शेजारी राहणाऱ्या महिलेचा फ्लॅट फोडून चोरट्यांनी २५ हजारांची रोकड चोरून नेली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक बालाजी डिगोळे करत आहेत.
सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे, शनिवारी ४० वर्षीय एका महिलेचा लुल्लानगर येथील मोहीत पॅरेडाईज या इमारतीतील फ्लॅट फोडत २ लाख ४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच, स्वारगेटमधील फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज लांबविला आहे. याबाबत एका ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदाराच्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने लांबविले. पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील तपास करत आहेत.
तसेच, शनिवारी उघडकीस आलेल्या घटनांमध्ये हडपसरमधील गोंधळेनगर येथील बंद फ्लॅट फोडून २ लाख ४५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांत ४५ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद केला आहे. तसेच, लोहगाव येथील पोरवाल रोडवरील सलूनचे दुकान फोडून चोरट्यांनी कॅश काऊंटरमधील दीड लाखांची रोकड चोरून नेली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांत २८ वर्षीय व्यवसायिकाने तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.