Photo Credit : Social Media
मुंबई: उरणमधील यशश्री शिंदे या २२ वर्षीय तरुणीची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या संशयित आरोपी दाऊद शेखला कर्नाटकमधून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटक पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. हत्या झाल्यानंतर दाऊद शेख फरार झाला होता. दरम्यान, यशश्रीच्या हत्येपूर्वीचे काही सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहेत. यात आरोपी दाऊद शेख हा तिचा पाठलाग करताना दिसत आहे.
एका व्हिडीओमध्ये, यशश्री रस्त्याने जाताना दिसत आहे. तर दाऊद शेख तिचा पाठलाग करताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता उरणसह राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. आरोपीवर कठोर कारवाई करा, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. दरम्यान गुरूवारी (25 जुलै) यशश्री नोकरीवर जाण्यासाठी घराबाहेर पडली. दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान, सायंकाळी साधारण साडेचार वाजण्याच्या सुमारास तिचा फोन बंद झाला. तेव्हापासून ती कोणालाच दिसली नाही. पण दाऊदने तिला गाठून तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2018-19 च्या काळात यशश्रीशी ओळख वाढवून दाऊदने तिला जाळ्यात ओढले आणि 2019 साली तिच्यावर अत्याचारही केला होता. यशश्री आणि तिच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दाऊदवर पॉक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करत त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली. दाऊदच्या मनात याच गोष्टीचा राग होता. काही दिवसांपूर्वी दाऊद तुरूंगातून सुटून आला. तेव्हापासून त्याने पुन्हा तिचा पाठलाग सुरू केला होता.
तुरुंगातून सुटल्यापासून तो यशश्रीला त्रास देत होता. पण तिने याबाबत कुणालाही सांगितले नव्हते. पण 25 जुलैलै यशश्री अचानक बेपत्ता झाली आणि दोन दिवसानंतर तिचा मृतदेह सापडला. तिच्या गुप्तांगांवर आणि पोटावर वार करून तिचा मृतदेह छिन्नविछिन्न केला होता. यशश्रीचा 27 जुलैला मृतदेह सापडला तेव्हा त्याची अवस्था खूपच भयानक होती. मृतदेहावर चाकूने वार केलेले होते. मृतदेहावर असंख्य जखमाही होत्या. कुत्रे मृतदेहाचे लचके तोडत होते. तिच्या हत्येनंतर तिच्या आई- वडिलांनी दाऊद शेखनेच तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे.