संग्रहित फोटो
विटा : राज्यात गांजा विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे पोलिसही अॅक्शन मोडवर आले आहेत. अशातचं आता एक मोठी बातमी समोर आली आहे. विटा पोलिस ठाण्याच्या धडक कारवाईत साळशिंगे (ता. खानापूर) आणि मायणी (ता. खटाव, जि. सातारा) येथील दोन गांजा विक्रेत्या महिलांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार उत्तम माळी यांनी फिर्याद दिली आहे.
शनिवारी गस्त सुरू असताना हवालदार संभाजी सोनवणे यांना साळशिंगे मध्ये वनवासवाडी रस्त्यालगतच्या एका घराजवळ एक महिला गांजा विकत आहे, अशी माहिती मिळाली. त्यांनी पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांना ही माहिती दिली. त्यावर पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे आणि उत्तम माळी पथकासह साळशिंगे येथे गेले असता एक महिला तिच्या घराच्या बाहेर सोप्यात गांजाची विक्री करताना सापडली. त्यावर तिथेच छापा टाकला असता या महिलेचे नाव हुसेनबी गुलाब शेख असल्याचे समजले.
तिला ताब्यात घेऊन तिच्याकडील पिशवीची झडती घेतली असता त्यात उग्र वासाचा ६२५ ग्रॅम तयार गांजा होता. त्यावर या पोलिस पथकाने उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांना त्या ठिकाणी बोलावले. त्यानंतर हुसेनबी शेख या संशयित महिलेला गांजा कोठुन आणला आहे. याबाबत अधिक विचारणा केली असता तिने तो गांजा मायणी येथील शोभा बाळकृष्ण चिवटेकडून घेतला असे सांगितले. त्यावर या पथकाने मायणी येथे जाऊन शोभा चिवटे या महिलेच्या घराची झडती घेतली असता तिथे १२ किलो २३१ ग्रॅम असा एकूण १२ किलो ८५६ ग्रॅम तयार उग्र वासाचा गांजा सापडला.
गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना ठोकल्या बेड्या
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली पुणे शहराच्या मध्यभागात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्या दोघांकडून ८२० ग्रॅम गांजा जप्त केला असून, युनिट एकच्या पथकाने ही कारवाई शुक्रवार पेठेत केली आहे. समाधान केदा पवार (वय ३३, रा. नाशिक), संदीप सखाराम खैरनार (वय ३८, रा. पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलीस अंमलदार सुजय रिसबुड व त्यांच्या पथकाने केली आहे.