Photo Credit- Social Media
बीड: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच, आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. बीडच्या आष्टी तालुक्यात एका ट्रकमालकाने ट्रकचालकाला डांबून ठेवून अमानुष मारहाण केली, ज्यामुळे चालकाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या क्रूर मारहाणीमुळे ट्रकचालकाच्या संपूर्ण शरीरावर गंभीर जखमा होऊन ते काळे-निळे पडले होते.या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत प्रकरणाची नोंद घेतली असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
बीडच्या आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथे एका ट्रकमालकाने चालकाला तब्बल दोन दिवस डांबून ठेवून अमानुष मारहाण केली. या क्रूर मारहाणीत चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. विकास बनसोडे, राहणार जालना, हा पिंपरी घुमरी येथील क्षीरसागर नावाच्या व्यक्तीच्या ट्रकवर चालक म्हणून काम करत होता. विकास आणि ट्रकमालक क्षीरसागर यांच्यात काही कारणावरून वाद झाला. या वादानंतर क्षीरसागरने विकासला डांबून ठेवत सतत मारहाण केल्याचा आरोप मृत विकासचा भाऊ आकाश बनसोडे याने केला आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपीवर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीदेखील या प्रकरणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. “पुन्हा स्व संतोष देशमुखांसारखीच घटना ? ही माणसं आहेत की जनावरं? आष्टी तालुक्यातील पिंपरी (घुमरी) विकास बनसोडे या युवकाचा खून आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील भाऊसाहेब शिरसागर यांच्याकडे विकास बनसोडे वय वर्ष 25 , हा जालना तालुक्यातील युवक ट्रक ड्राइवर म्हणून, गेले ४ वर्ष कामाला होता. या युवकाचा जागीच मृत्यू झाला मृत्यू झाल्याचे कळताच कडा चौकीला कळवण्यात आले. एक आरोपीला अटक झाली असे सांगण्यात आले. कधी थांबणार हे?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या या घटनेचा सखोल तपास केला जात आहे. याप्रकरणी कोणालाही सोडले जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. चालकावर किती अमानुष मारहाण करण्यात आली, हे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंवरून स्पष्ट दिसत आहे. बीडमध्ये सातत्याने मारहाणीचे व्हिडीओ समोर येत असताना, हा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे, आणि नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.
Ratnagiri : बीड प्रकरणावर भाई जगताप यांनी व्यक्त केला तीव्र संताप; म्हणाले…
अंजली दमानिया यांनी सकाळी या प्रकरणावर भाष्य करत तीव्र नाराजी व्यक्त केली. विकास बनसोडेच्या भावाने काही गंभीर आरोप केले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.सातत्याने बीडमध्ये अशा प्रकारच्या घटना समोर येत आहेत. याआधीही धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर यांच्या मारहाणीचे धक्कादायक दोन व्हिडीओ समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला आणि दादा खिंडकर यांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांच्यावरही अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या घटनांमुळे बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.