'औरंगजेबाइतकेच देवेंद्र फडणवीस क्रूर शासक'; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
औरंगजेब क्रूर शासक होता का? यावरून राज्यासह देशभरात राजकारण तापलं आहे. दरम्यान बजरंग दलाने ही कबर हटवण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे मिलिंद एकबोटे यांनी ही कबर नष्ट करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता सरकारने औरंगजेबच्या कबर परिसरात सुरक्षा वाढवली आहे. हे प्रकरण तापलेले असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, औरंगजेब हा क्रूर शासक होता, देवेंद्र फडणवीस देखील तेवढेच क्रूर आहेत. ते धर्माचा आधार घेत आहेत. औरंगजेबाची कबर उचलून टाका, असं सांगत आहेत. याचा अर्थ त्यांना मराठी माणसांचा, मावळ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकायचा आहे. औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष आहे. क्रूर प्रवृत्तीच्या माणसाला आम्ही गाडतो, हे त्या ठिकाणी दिसून येते, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात केलाय.
तुम्ही राजीनामा द्या…
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांना बदनाम करण्याचं षडयंत्र हे काँग्रेसच्या माध्यमातून चालू असल्याची टीका शिवेंद्रराजे भोसले यांनी केले आहे. काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याला महत्व दिलं नसल्याचही त्यांनी म्हटलं आहे. आता यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवेंद्रराजे भोसले यांना प्रत्युत्तर दिले आहे. शिवाजी महाराजांचा अपमान केला जात आहे, तुम्ही राजीनामा द्यावा, असे म्हणत त्यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला. तर तुम्ही ज्या पक्षात राहिलेला आहात तो पक्ष शिवाजी महाराजांच्या विचारांच्या विरोधात आहे. तुम्ही या पक्षात राहू नये, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भाजपचे अनेक फेल्युअर आहेत. टोळ्या एकत्र येऊन स्थापन झालेले हे सरकार आहे. गँग ऑफ सरकार या सरकारमध्ये मान पानाचा खेळ आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आम्हाला महाविकास आघाडी करताना अडचणी आल्या. महाराष्ट्राची सद्भावना लयाला नेण्याचं काम भाजपने केलं. खोक्या रिटर्न्स, नवीन खोक्या जन्माला आलाय. या अगोदर पन्नास कोटी एकदम ओके, असं ऐकलं होतं. कोकणातील सामाजिक स्वास्थ भाजपकडून बिघडवले जात आहे. कोकणातील नैसर्गिक साधन संपत्ती उद्योजकांना विकायची आहे. उद्योगपतींना सांभाळण्याकरता कोकणातल्या सामान्य माणसाचा बळी देऊ नका, अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.