Photo Credit-Social Media तहव्वूर राणाबाबतचा निर्णय कोण घेणार...? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं
मुंबई: २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याला १० एप्रिल रोजी अमेरिकेतून प्रत्यार्पित करून दिल्लीतील न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील चौकशीसाठी त्याला कुठे नेले जाईल, याचा निर्णय राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि केंद्रीय गृह मंत्रालय घेतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “मुंबई पोलिस एनआयएला संपूर्ण सहकार्य करतील. चौकशीसाठी राणाला कुठे नेले जाईल, याबाबतचा निर्णय एनआयए घेईल. आम्हाला तपासासाठी काही माहिती हवी असल्यास ती एनआयएकडून मागवू.”
मुख्यमंत्र्यांनी तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. “दहशतवादी हल्ल्यात कुटुंबीय गमावलेल्या मुंबईकरांच्या वतीने मी पंतप्रधानांचे आभार मानतो,” असे ते म्हणाले.
“कसाब आमच्यासाठी ओझे होता” – फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “२६/११ चा कट रचणारा राणा आता आपल्या ताब्यात आहे, याचा आनंद आहे. कसाबला कायद्यानुसार फाशी देण्यात आली, तो आमच्यासाठी ओझे होता. पण आता मुख्य सूत्रधार भारतात आहे आणि एनआयए या प्रकरणाचा तपास करत आहे. त्यांना आवश्यक ती मदत मुंबई पोलिसांकडून केली जाईल.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील कटकारस्थानात सामील तहव्वूर राणाच्या भारतात प्रत्यार्पणाबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “कटकारस्थान करणाऱ्यांना भारतात आणले जात आहे, याबद्दल मला अतिशय अभिमान वाटतो. हे केवळ एका आरोपीचे पुनरागमन नाही, तर २६/११ च्या हल्ल्यात बळी पडलेल्या पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.”
“२६ नोव्हेंबर २००८ रोजी भारताने आपल्या इतिहासातील सर्वात भयावह दहशतवादी हल्ल्याचा सामना केला. पाकिस्तानातून आलेल्या १० दहशतवाद्यांनी मुंबईला ६० तास ओलीस धरले आणि १६६ निष्पाप नागरिकांचा बळी घेतला. या हल्ल्यातील एकमेव जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी अजमल कसाब याला भारतीय न्यायव्यवस्थेने कायदेशीर मार्गाने फाशी दिली. मात्र, या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणा परदेशात लपून बसला होता.”
फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक करताना सांगितले, “राणाच्या प्रत्यार्पणामागे भारताच्या राजनैतिक आणि आंतरराष्ट्रीय धोरणाचे यश आहे. यासाठी मी पंतप्रधानांचे आभार मानतो. या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) कडे असून, महाराष्ट्र पोलिस त्यांना पूर्ण सहकार्य करतील. तपासात जर नवीन माहिती समोर आली, तर केंद्रीय गृह मंत्रालय आणि एनआयए एकत्रितपणे पुढील निर्णय घेतील.”
राजकीय आरोपांवर फडणवीस यांची टीका
२६/११ च्या हल्ल्यात आरएसएसचा सहभाग असल्याचे दावे करणाऱ्यांवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले, “अशा निराधार आणि मूर्ख विधानांना मी उत्तर देत नाही. या प्रकरणाच्या तपासात आम्ही अमेरिकेत तुरुंगात असलेल्या डेव्हिड कोलमन हेडलीचा जबाब नोंदवला होता. त्यात स्पष्टपणे नमूद केले होते की, हा संपूर्ण हल्ला पाकिस्तानमध्ये रचण्यात आला होता आणि त्यामागे तिथल्या सरकारी यंत्रणांचा हात होता. देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर काही राजकीय पक्ष जे जबाबदारीशून्य विधानं करतात, ती अत्यंत दुर्दैवी आहेत. दहशतवादाचा कोणत्याही धर्माशी किंवा संघटनेशी संबंध नसतो, आणि राष्ट्रीय सुरक्षेपेक्षा मोठा अजेंडा कोणीही ठेवू नये.”
दिग्विजय सिंह यांना फडणवीस यांचे प्रत्युत्तर
२०१० मध्ये २६/११ हल्ल्याबद्दल काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, “मी अशा लोकांना उत्तर देत नाही जे मूर्खासारखे बोलतात. कसाबची फाशी आणि डेव्हिड हेडलीचे जबाब दाखवतात की संपूर्ण कट पाकिस्तानमध्ये रचला गेला होता. आता मुख्य कट रचणारा आपल्या ताब्यात आहे, त्यामुळे आणखी सत्य समोर येईल.”