पुण्यातील पीएमपीएमएल बसमध्ये महिलांच्या दागिन्यांची आणि पैशांची चोऱ्यांचे प्रमाण वाढले (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : पुणे शहरामध्ये अंतर्गत वाहतूकीसाठी पीएमपीएल बसचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. ऑफिसला येण्या जाण्याच्या वेळेला बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असते. मात्र या गर्दीचा फायदा आता चोरटे घेऊन लागले आहेत. पीएमपीएल बसमध्ये वाढत्या चोरींच्या घटना चिंता वाढवत आहेत. महिला आणि त्यांचे दागिने व पैशांवर हे चोरटे डल्ला मारत असून ही बाब अत्यंत सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करत आहे.
पुणे शहरातील स्वारगेट आणि वानवडी भागात या बसमधील चोरीचे प्रमाण जास्त आहे. स्वारगेट आणि वानवडी बसमधून प्रवास करणार्या महिलांकडी तब्बल 1 लाख 42 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी स्वारगेट आणि वानवडी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र यामुळे बसमध्ये देखील महिला सुरक्षित नसल्याची बाब समोर येत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बसमध्ये लाखोंचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी एका ६२ वर्षीय ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून वानवडी पोलीस ठाण्यात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधीत महिला ही मंगळवारी (दि.७) दुपारी पिंपळे गुरव ते हडपसर मार्गावरील बसमधून प्रवास करत होती. त्यावेळी बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्याने महिलेच्या पर्समधील 3 हजारांची रोकड आणि सोन्याची अंगठी असा 32 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. महिलेच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली.
सहायक फौजदार कुंभार पुढील तपास करीत आहेत. तर, कात्रज ते स्वारगेट मार्गावर घडलेल्या घटनेबाबत 51 वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. संबधित महिला गुरुवारी (दि.09) सुसगाव येथून पीएमपीने कात्रज येथे आली. त्यानंतर कात्रज येथून स्वारगेट बसने प्रवास करीत असताना गर्दीत त्यांच्याकडील एक लाखांचे दागिने चोरी गेल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक शैलेश आल्हाटे पुढील तपास करीत आहेत.
क्राईम न्यूज वाचण्यासाठी क्लिक करा
दरम्यान, मागील काही दिवसांपासून शहर परिसरात पीएमपीएल बसमध्ये चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः स्वारगेट, पुणे स्टेशनसह इतर गर्दीच्या मार्गावरील बसमध्ये हे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. बसमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून नागरिकांकडील लाखोंचा ऐवज लांबविला जात आहे. पोलिसांचेही या घटनांकडे दुर्लक्ष होत असून गेल्या काही दिवसांत अशा चोर्या उघडकीस येण्याचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे चोरटे बसमधील गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने लंपास करत आहेत.