संग्रहित फोटो
पुणे : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. दररोज वेगवेगळ्या भागात घटना घटना घडत असल्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता पुण्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका शिकवणी चालकाने विद्यार्थीनीशी अश्लील कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. शिकवणी चालकाला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. सुरेश दौलत रौंदळ (वय ४६, रा. गौरव राज बिल्डींग, दत्तनगर, आांबेगाव, कात्रज) असे अटक केलेल्या शिकवणी चालकाचे नाव आहे. याबाबत एका अल्पवयीन मुलीने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी आरोपी रौंदळ याच्याकडे शिकवणीला येत होती. स्वारगेट भागात आरोपी रौंदळ खासगी शिकवणी चालवितो. गुरुवारी (९ ऑक्टोबर) सकाळी पावणे आठच्या सुमारास मुलगी शिकवणी वर्गात एकटीच होती. त्यावेळी आरोपी रौंदळ याने मुलीशी संवाद साधला. ‘तू शिकवणी वर्गात प्रवेश घेतल्यापासून मला खूप आवडते. मी शाळा सुरू करणार आहे. तू शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी तुला शाळेत नोकरी देईल तसेच तुला मी सोन्याची रिंग देणार आहे’, असे सांगून रौंदळने मुलीशी अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने याबाबतची माहिती कुटुंबीयांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच सहायक निरीक्षक राहुल कोलंबीकर, उपनिरीक्षक पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी रौंदळला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्यावर बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) तसेच विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.