संग्रहित फोटो
बारामती : राज्यासह देशभरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लुटमार, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढल्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. गुन्हेगारीला पोलिसांनी आळा घालण्याची गरज आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत महिन्याला लाख रुपयांची खंडणीची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच धमकी देत कंपनीतील कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली आहे.
याप्रकरणी पाच जणांविरोधात बारामती तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव विलास धोंडे (मूळ रा. धोंडेवस्ती, राशिन, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर; सध्या रा. बयाजीनगर, एमआयडीसी बारामती) यांनी फिर्याद दिली असून, प्रमोद आटोळे (रा. सावळ, ता. बारामती), ऋषी गावडे (रा. मेडद, ता. बारामती) व अन्य तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सावळच्या जगदंबानगरमधील वैभव हायड्रोलिक्स कंपनीत शनिवारी (दि. ४) रोजी सायंकाळी ५ ते बुधवारी दिनांक ८ रोजी दुपारी अडीचच्या दरम्यान घटना घडली आहे. कंपनीचे मॅनेजर नितीन राऊत यांना ऋषी गावडेने फोन करून, ‘मी ऋषी गावडे बोलतोय, तुला लय माज आला आहे का? तू प्रमोद आटोळे यांना माणसांत पैसे का मागितले? तुम्ही बाहेरून धंदा करायला येऊन पैसे मागता का? तुम्ही लायकीत राहा, नाही तर हातपाय तोडून दुकान बंद करून टाकीन,’ अशी धमकी दिली. त्यानंतर मंगळवारी (दि. ७) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीला कंपनीच्या गेटजवळ भेटण्यासाठी बोलावले. तेथे फिर्यादी आला. ‘मी उद्या तुझ्या कंपनीत येणार आणि तुझी कंपनी बंद करून टाकणार, तुला जर तुझी कंपनी चालवायची असेल तर मला महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागतील,’ अशी मागणी केली.
हे सुद्धा वाचा : तू मला खूप आवडते, मी तुला नोकरी लावतो अन्…; पुण्यातील संतापजनक प्रकार
कामगारांना दांडक्याने मारहाण
बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कंपनीतील कामगारांना दांडक्याने मारहाण करण्यात आली. तसेच पिस्तूल हातात घेत ‘इथे काम करायचे नाही’ असे म्हणत जमाव जमवून शिवीगाळ, दमदाटी करण्यात आली. या घटनेत इन्नूस इनामदार, आशिष साहो, राधेशाम दुबे, फिरोज अन्सारी हे कामगार जखमी झाले आहेत.